नागपूर : राज्यातील भाजप नेत्यांवर तुटून पडणारी शिवसेना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर ठेवते का? दुसरीकडे नितीन गडकरीही आपल्या अनुभवातून सेनेच्या मंत्र्यांना मार्गदर्शन करतात का? असा प्रश्न निर्माण होण्याचे कारण म्हणजे नागपुरात पार पडलेला परिवहन विभागाचा एक कार्यक्रम. नागपूर ग्रामीण आणि नागपूर पूर्वच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नव्या कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात एक खास फ्रिक्वेन्सी दिसून आली.


एका बाजूला परब यांनी गडकरी यांच्या कामाची स्तुती करत राज्याच्या परिवहन विभागाच्या कामाला आणखी प्रभावी बनवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन मागितले तर प्रतिउत्तरात नितीन गडकरी यांनीही अनिल परब यांना कामाची पोचपावती देत अनेक नव्या योजनांची गुरुकिल्ली देत परिवहन विभागाच्या कामात सुधारणांसाठी मार्गदर्शन केले. नितीन गडकरी यांच्या आधी भाषणासाठी उभे राहिलेल्या अनिल परब यांनी नितीन गडकरी यांच्या कामाची पद्धत आपण सर्वच ओळखून आहोत. राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी चांगले रस्ते बनविले होते. आता ते देशात चांगले गुळगुळीत रस्ते तयार करत आहेत.


आता राज्याचा परिवहन मंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की त्या रस्त्यांवर धावणारी वाहतूक सुरक्षित राहावी, असे परब म्हणाले. यासाठी राज्यात चांगले वाहनचालक तयार होणे, योग्य माणसांनाच लायसन्स मिळणे गरजेचे असून त्यासाठी राज्यात ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी नितीन गडकरी यांनी केंद्राच्या निधीतून मदत करावी अशी अपेक्षा परब यांनी व्यक्त केली. प्रतिउत्तरात नितीन गडकरी यांनीही दिलखुलासपणे अनिल परब यांच्या कामाची प्रशंसा करत आपण विधानपरिषदेपासून अनिल परब यांचे काम पाहत आहोत. आता परिवहन विभागातही अनिल परब चांगले काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात परिवहन विभाग चांगले बदल घडवून आणेल असा विश्वास असल्याचे गडकरी म्हणाले.


देशात आणि राज्यात अपघात घडणारे हजारो ब्लॅक स्पॉट आहे. 2024 च्या आधी हे ब्लॅक स्पॉट 50 टक्क्यांनी कमी करायचे असून महाराष्ट्रात हे काम करण्यासाठी अनिल परब यांच्या मदतीची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकाच्या बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करून त्यात स्मार्ट कार्ड आधारित तिकीट प्रणाली लागू करण्याचा सल्लाही गडकरी यांनी परब याना दिला. शिवाय महाराष्ट्रातील छोट्या शहरात आणि ग्रामीण भागात अनिल परब यांनी इलेक्ट्रिक आणि इथेनॉल वर चालणाऱ्या बाईक्सला टॅक्सी सेवेची परवानगी द्यावी, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास राज्यात तब्ब्ल 50 हजार तरुणांना रोजगार मिळू शकेल असे गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि क्रीडा मंत्री सुनील केदार हेही उपस्थित होते. मात्र, केंद्रीय आणि राज्याच्या परिवहन मंत्र्यांची एकमेकांबद्दलची फ्रिक्वेन्सी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.