नागपूर : विदर्भात असलेले ढगाळ वातावरण आणि नागपुरात कालपासून गारपीट आणि मुसळधार पाऊस बरसल्यानंतर याचा परिणाम आता विदर्भाच्या अन्य भागात जाणवू लागला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे.


चंद्रपूर शहर-जिल्ह्यात काल (गुरुवार)पूर्ण दिवसभर ढगाळलेले -कुंद वातावरण होते. उशिरा रात्री पावसाच्या सरींना प्रारंभ झाला. पहाटे काही कालावधीसाठी पावसाचा जोर वाढला होता. सकाळी थोड्या-थोड्या कालावधीने पाऊस बरसत असून सध्या शहर जिल्ह्यातील वातावरणात हलके धुके पसरले आहे. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे शेत शिवारात असलेली गहू-हरभरा या पिकांना नुकसान पोचण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पूर्ण दिवस पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढचे काही दिवस शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी ठरणार आहेत.

मराठवाड्यातही पावसाची हजेरी -
सलग तीन दिवसापासून परभणी शहरासह जिल्हाभरात पाऊस सुरू आहे. आज पहाटेपासून सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे, पावसाळ्या प्रमाणे हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली आहेत. हरभरा, ज्वारी, तूर या पिकांवर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव झाला असून मागच्या आठवडाभरापासून सूर्यदर्शन नसल्यामुळे या पिकांची अवस्था बिकट होत चालली आहे. सकाळी पाऊस, दुपारी गर्मी आणि सांयकाळी थंडी अशा तिन्ही ऋतूंचा अनुभव सध्या परभणीकरांना येतोय.

नववर्षाच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाचा फटका -
अमरावती जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे खरिप हंगामातील तूर, कपाशी आणि रब्बी हंगामातील गहू, हरबरा या पिकांचे नुकसान झाले आहे. तर, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचा हंगाम धोक्यात आला असून गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर कालपासून झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि तूर हे पिक धोक्यात आलं आहे. हिंगोली शहरात काल सकाळी सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. तर जिल्ह्यातील इतरही भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. नववर्षातील पहिल्याच अवकाळी पावसामुळे कापणीला आलेल्या तूर पिकाचे आणि शेतातील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा - राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, नागपूर आणि अमरावतीत गारपीट

Uncertain Rain and Hailstorm | विदर्भात गारपीट, शेतीचंं मोठं नुकसान | ABP Majha