Nagpur Railway Time Table : मुंबई जाण्यासाठी नागपूरकरांसाठी सोयीटी ठरत असलेल्या नागपूर-मुंबई-नागपूर (Nagpur) दुरंतो एक्स्प्रेसमध्ये प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहे. रेल्वे प्रशासनाच्यावतीने 9 असलेल्या थर्ड एसी कोचची संख्या 15 करण्यात येणार असून 8 स्लीपर कोचची संख्या दोनवर आणण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्लीपर तिकीट उपलब्ध नसल्यास प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार दुरंतोमध्ये प्रवाशांकडून थर्ड एसीची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने ती पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 15 जूनपासून नवीन बदलाचा हा निर्णय अंमलात येणार आहे. या नवीन बदलामुळे नागपूरहून मुंबईला येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
नव्या बदलानुसार, या रेल्वेगाडीत आधी एक फर्स्ट एसी, तीन सेकंड एसी होत्या. दोन जनरेटर व्हॅन होत्या. त्या तशाच राहणार आहेत. मात्र, आधी थर्ड एसी 9 होत्या. त्या आता 15 करण्यात येणार आहेत. आधी स्लीपर कोच आठ होते. त्याची संख्या कमी करुन 2 करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 12290 नागपूर-सीएसएमटी मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये हा बदल 15 जूनपासून लागू होणार असून, गाडी क्रमांक 12289 सीएसएमटी मुंबई-नागपूर एक्स्प्रेसमध्ये हा बदल 16 जूनपासून लागू होणार आहे. 17 फेब्रुवारीपासून सर्व बुकिंग केंद्रांवर तसेच रेल्वेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन बुकिंग (रिझर्वेशन) करता येणार आहे.
तिकीटदर (IRCTC अॅपनुसार)
- स्लीपर : 685 रुपये (453 रुपये बेस फेअर, 20 रुपये रिझर्वेशन चार्चेज, 30 रुपये सुपर फास्ट चार्जेस, 182 रुपये डायनॉमिक चार्जेस)
- 3 एसी : 1890 रुपये (1223रुपये बेस फेअर, 40 रुपये रिझर्वेशन चार्चेज, 45 रुपये सुपर फास्ट चार्जेस, 490 रुपये डायनॉमिक चार्जेस, 90 रुपये जीएसटी)
खर्च वाढणार
नागपूर ते मुंबई असो किंवा मुंबई ते नागपूर रेल्वे सुटण्याची वेळ ही रात्रीची असल्याने अनेकांकडून स्लीपर कोचला पसंती दिली जाते. रात्री तापमानही सहसा कमी असल्याने गर्मी जाणवत नाही. स्लीपर कोचच्या तिकीटापेक्षा एसी कोचचे तिकीट दर जवळपास तीन पटीने जास्त आहे. त्यामुळे आता नागपूरकरांचा मुंबई वारीचा खर्च वाढणार आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीस निर्णय
रेल्वेने प्रवास करताना एसीची खरी गरज उन्हाळ्यात असते. रेल्वे प्रशासनाने थर्ड एसी वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणी 15 जूनपासून होणार आहे. तोपर्यंत उन्हाळा जवळपास संपल्यात जमा असतो. पावसाचे आगमन होत असल्याने उन्हाची तीव्रताही कमी होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस एसी वाढवण्याऐवजी मार्च महिन्यापासून त्याची अंमलबजावणी केल्यास प्रवाशांना चांगला दिलासा मिळू शकतो.