Nagpur Airport Gold Smuggling : सोन्याच्या तस्करीसाठी नागपूर मार्ग पूर्वी 'सेफ पॅसेज' समजला जाएचा, मात्र तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे नागपूर विमानतळावरुन होणाऱ्या तस्करीवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. नागपुरातील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (AIU) मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dr Babasaheb Ambedkar International Airport) सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावला. या कारवाईनुसार एआययूने तस्करी करुन आणण्यात येत असलेले जवळपास 700 ग्रॅम सोने गो एअरच्या मुंबईवरुन नागपुरात आलेल्या फ्लाईट क्रमांक जी 8-954 च्या केबिन टॉयलेटमधून जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या या सोन्याची किंमत 40 लाख 49 हजार 500 रुपये आहे. हे विमान फुकेतवरुन मुंबईला आले होते. त्यानंतर, हे विमान मुंबईवरुन नागपुरात आले.
गो एअरच्या विमानातून सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर नागपूरच्या सीमा शुल्क विभागाचे आयुक्त अभय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या निर्देशानुसार, नागपूर विमानतळाचे सहायक आयुक्त अविनाश पांडे यांच्या नेतृत्वात जाळे टाकण्यात आले. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात नागपूर सीमाशुल्क विमान प्रवाशांना थांबवून त्यांची विभागाच्या पथकाने दोन संशयित चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन, विमानाच्या केबिन टॉयलेटमधून जवळपास 700 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. या पथकात निरीक्षक दीपक सोनटक्के, अविनाश पराते, अविनाश खोब्रागडे, राजेश नवलाखे आणि मनिष पंढरपूरकर यांचा समावेश होता. या प्रकरणाचा तपास सीमाशुल्क विभागाने सुरु केला आहे. तस्करीचा असाच प्रयत्न नागपूर सीमाशुल्क विभागाने 10 जानेवारी, 2023 रोजी निष्फळ करुन 1.73 किलो सोने जप्त केले होते.
आंतरराष्ट्रीय विमानांमधून केली जाते तस्करी
सोन्याच्या तस्करीसाठी तस्करांकडून इंटरनॅशनल फ्लाईटचा वापर करण्यात येत आहे. या फ्लाईटनंतर डोमेस्टिक फ्लाईटमध्ये रुपांतरित होतात. अशा फ्लाईटमुळे तस्करांना इंटरनॅशनल एअरपोर्टवर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीतून बचाव करण्याची संधी मिळते, परंतु नागपूरच्या सीमाशुल्क विभागाने सतर्कता बाळगून इंटेलिजन्स आणि डाटाचे विश्लेषण करून नागपूर विमानतळावर सोन्याची तस्करी पकडली आहे.
आता देशातंर्गत सोन्याची तस्करी
आयातीत सोन्यावरील कस्टम ड्युटी वाचवण्यासाठी आता विदेशातून आणलेल्या सोन्याची तस्करी देशांतर्गत विमान सेवेद्वारे होऊ लागली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशातंर्गत विमानातील प्रवाशांवर विभाग लक्ष ठेवून आहे. कस्टम विभाग अर्थव्यवस्थेचा कणा असून, अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून विभाग दक्ष आहे. गेल्यावर्षी नागपूर विमानतळावर तीन घटनांमध्ये 5 कोटी किमतीचे जवळपास 10 किलो सोने पकडले होते. हे सोने रिझर्व्ह बँकेला विकण्यात आले आणि त्यातून मिळालेले 5 कोटी रुपये सरकारच्या खात्यात जमा करण्यात आले.