Nagpur News नागपूर : उपराजधीनी नागपूरात (Nagpur News) उद्या 8 मार्चपासून 22व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ( International Film Festival) नागपूर आवृत्तीला प्रारंभ होत आहे. प्रख्यात दिग्दर्शक आणि 'पिफ'चे संचालक डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांच्या मार्गदर्शनात येत्या 8 मार्च ते 10 मार्च रोजी नागपुरातील व्हीआर मॉलमधील सिनेपोलिसमध्ये हा महोत्सव होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवांतर्गत दहा ग्लोबल फिल्म्स, दोन इंडियन फिल्म्स, दोन मराठी फिल्म्स तसेच एक डॉक्युमेंटरी सादर होणार आहे. यात एकूण 16 सत्रे असून ज्यामध्ये 14 फिल्म्स आणि दोन विशेष सत्रे असतील. ग्लोबल फिल्म्स आणि वर्ल्ड कॉम्पिटिशनच्या कॅटेगरीत दोन इराणी, दोन पोर्तुगीज, दोन फ्रेंच, दोन इटालियन, एक इजिप्तची आणि एक स्पॅनिश अशा जगभरातील फिल्म देखील नागपूरकरांना बघता येणार आहे.
देशविदेशातील चित्रपटांची मेजवानी
महाराष्ट्र शासनाद्वारे प्रस्तुत, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, सांस्कृतिक कार्य संचालनालय, पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शुक्रवार, 8 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमस्थळी डॉ. जब्बार पटेल अध्यक्षस्थानी राहतील. तर 'पिफ'चे क्रिएटिव्ह डायरेक्टर, फिल्मगुरू समर नखाते, डेप्युटी डायरेक्टर विशाल शिंदे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जगभरातील दिग्दर्शकाच्या फिल्म्स बघणे ही मोठी पर्वणी नागपूरकरांसाठी असणार आहे. यानिमित्त सांस्कृतिक आदान-प्रदान होते. डॉ. जब्बार पटेल यांच्या नेतृत्वात 'पिफ' ही पुण्याची जागतिक ओळख झाली आहे. तेच पर्व नागपुरात सुरू होत आहे. नागपूर तसेच विदर्भातील रसिकांनी या फेस्टिव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महोत्सवाचे मुख्य संयोजक अजेय गंपावार यांनी केले आहे.
दोन सत्रात 14 फिल्म्सची पर्वणी
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवांतर्गत दहा ग्लोबल, दोन भारतीय, एक डॉक्युमेंटरी आणि दोन मराठी चित्रपटांची मेजवानी असणार आहे. या महोत्सवात 9 आणि 10 मार्च रोजी सकाळी 10 ते रात्री 8.30 वाजतापर्यंत एकूण 16 सत्रे असून यात 14 फिल्म्स आणि दोन विशेष सत्रे असतील. ज्यामध्ये 'जिप्सी' आणि 'छबिला' हे दोन मराठी चित्रपट देखील यात सादर होणार आहेत. विशेष म्हणजे, 'जिप्सी' चित्रपटाचे दिग्दर्शक शशी खंदारे आणि ज्युरी पुरस्कार विजेता बालकलाकार कबीर खंदारे हेही महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या