Anil Deshmukh नागपूर : नागपूरात 4 मार्च 2024 ला भारतीय जनता (BJP) युवा मोर्चाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या  (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरात 'नमो युवा महासंमेलना'चे आयोजन करण्यात आले होते. परंतु, विद्यापीठाच्या शासकीय जागेवर राजकीय कार्यक्रमांना विद्यापिठाने परवानगी कशी दिली? असा प्रश्न उपस्थित करत सर्व नियम धाब्यावर बसवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. यासाठी त्यांनी थेट राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 


महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?


राज्यपाल रमेश बैस यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी म्हटले आहे की,  या कार्यक्रमाला कोणतेही नियम आणि अटी लावण्यात आल्या नाहीत. कोणताही कार्यक्रम करीत असताना साधारणतः अगोदर परवागी घेण्यात येते आणि नंतर कार्यक्रम जाहीर करण्यात येतो. परंतु, अगोदर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आणि नंतर विद्यापीठाकडून परवानगी घेण्यात आली. परवानगी देताना काही नियम आणि अटी साधारणतः लावल्या जातात. परंतु या ठिकाणी असे झालेले नाही. विद्यापीठाचे काम सुरू असताना ही परवानगी कशी देण्यात आली? ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला, त्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर हा विद्यापीठाचा मुख्य शैक्षणिक परिसर आहे. तसेच याच परिसरात विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे.


या परिसरात कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिवसह जवळपास 80 टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. कामकाजाच्या दिवशी परवानगी कशी आणि का देण्यात आली? असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आणि प्रश्न या पत्रात उपस्थित करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशाकीय इमारत परिसर हा शांतता झोन असतानाही तिथे जोरजोरात नारेबाजी करण्यात आली. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.


राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष 


लोकसभा निवडणूकीपूर्वी मध्य भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने उपराजधानी नागपूरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात या संमेलनाला आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला राज्यभरातील 18 ते 35 वयोगटातील 1 लाख युवक सहभागी होणार असल्याचा दावा त्यावेळी भाजयुमोतर्फे करण्यात आला होता. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी जमलेल्या युवा कार्यकर्त्यांना संबोधित केले. मात्र, या कार्यक्रमाला देण्यात आलेल्या परवानगी विरोधात राष्ट्रीय युवक काँग्रेसने देखील विरोध दर्शवत आंदोलन केले होते. त्यामुळे या महासंमेलनाला सुरुवातीपासूनच वादाची किनार लाभली होती. आता राज्यपाल या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या