Nagpur Municipal Corporation : नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) मालमत्ता कर विभागाद्वारे (Property Tax) आशीनगर झोनमधील आठ थकबाकीदारांवर सोमवारी कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये आठही थकबाकीदारांकडील साहित्य जप्त करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांच्या आदेशान्वये आशीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त हरीश राऊत यांच्या नेतृत्वातील पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. मात्र थकबाकीदारांकडे लाखों रुपयांचे मालमत्ता कर बाकी असताना फक्त टेबल आणि खुर्च्या मनपाच्या पथकाने जप्त केल्याने कारवाई फक्त खानापूर्तीसाठी करण्यात आली असल्याची मनपा वर्तुळात चर्चा आहे.


कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु, (जगत सेलीब्रेशन हॉल, पावरग्रीड चौक, नागपूर), देवेंद्र नामदेवराव पवार (पवार सावजी भोलनालय, पाटणकर चौक, नागपूर.), भूषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी, प्रितमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. 129, 129 / अ (गुज्जर लॉन, पाटणकर चौक, नागपूर), प्रतिभा अश्विन शंभरकर व इतर अशी मालमत्ता कर थकबाकीदारांची नावे आहेत. कुलदीप कौर बलविंदरसिंग सग्गु यांच्यावर 9,88,220 रुपयांचा मालमत्ताकर थकित होता. कारवाईच्या वेळी मोक्यावर असलेले सर्व टेबल खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलेले, असून सुपूर्दनाम्यावर नोंद मालमत्ताधारक यांना सुपूर्द करण्यात आले. देवेंद्र नामदेवराव पवार यांचा 1,17,486 रुपये मालमत्ताकर थकित होता. या मालमत्ताधारकाचेही भोजनालयात वापरात असलेले सर्व टेबल, खुर्ची आणि इतर साहित्य जसे 2 मोठे फ्रिज, 17 खुर्ची, 4 टेबल आणि टीव्ही जप्त करण्यात आले. भूषण भाऊ मुकेश भा. उमेश संतलाजी हासानी यांच्यावर थकित मालमत्ताकरापोटी 1,50,563 एवढा कर थकित होता. या मालमत्ताधारकाचे 1500 चौ.फू. चे खुले भूखंड आणि त्यावर कच्चे स्वरुपाचे बांधलेले 100 चौ.फू.चे 1 रुम आणि त्या रुममध्ये असलेल्या 2 खुर्च्या, 1 टीव्ही आणि 1 मोटर सायकल जप्त करण्यात आली. कारवाईत सहाय्यक अधीक्षक अनिल कऱ्हाडे, कर निरीक्षक सचिन मेश्राम, मनोज नाईकवाडे, कवडू बहादुरे आणि या वार्डाचे कर संग्राहक शशिभूषण वालदे आणि प्रदीप तुंबडे यांनी भाग घेतला. 


भूखंड जप्त, 2 लॉनवर कारवाई


प्रीतमसिंग चरणसिंग गुज्जर, प्लॉट नं. 129, 129/अ यांच्यावर 7,88,568 आणि 2,45,560 अशा 2 लॉन मिळून एकूण 10,34,128 एवढा मालमत्ता कर थकित होता. त्यामुळे लॉनमधील साहित्य जप्त करण्यात आले. प्रतिभा अश्विन शंभरकर आणि इतर यांच्या मालकीचे घराचे एकूण 6,36,521 रुपयाचा  मालमत्ताकर थकित होता. कर भरण्यास टाळाटाळ होत होती. त्यामुळे त्यांचे राहते घर (स्थावर मालमत्ता) जप्त करण्यात आली.


ही बातमी देखील वाचा


नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याची रॅगिंग, सहा सीनियर्सची इंटर्नशिप रद्द; व्हिडीओमधून घटना उघड