Nagpur News : नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC) म्हणजेच मेडिकलमध्ये ज्युनियर विद्यार्थ्याची रॅगिंग केल्याप्रकरणी सहा सीनियर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. रॅगिंग झालेला ज्युनियर विद्यार्थी एमबीबीएस प्रथम वर्षाचा आहे. तर रॅगिंग केल्याचा आरोप असलेले सहा विद्यार्थी एमबीबीएसनंतर इंटर्नशीप करणारे आहेत.


काही दिवसांपूर्वी रॅगिंगचे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समितीकडे पाठवले होते. सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे पाठपुरावा झाल्यानंतर रॅगिंगचा आरोप असलेल्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली आहे. रॅगिंग दरम्यान सीनियर विद्यार्थी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास देत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे, असं महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ राज गजभिये यांनी सांगितले. 


दबावामुळे उशिरा तक्रार


सहा महिन्यांपूर्वी हा संपूर्ण प्रकार घडला असून सीनियर विद्यार्थ्यांच्या दबावामुळे पीडित विद्यार्थ्यांनी उशिरा तक्रार केल्याचेही डॉ. राज गजभिये म्हणाले. रॅगिंगचा हा प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने त्याची तक्रार आणि काही पुरावे सेन्ट्रल रॅगिंग समितीकडे पाठविले होते. सेंट्रल रॅगिंग कमिटीनेक महाविद्यालय प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर महाविद्यालयाने ही कारवाई केली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली.


सर्व सीनियर्स 2017 च्या बॅचमधील


प्राप्त माहितीनुसार रॅगिंग करणारे सर्व सहा विद्यार्थी हे मेडिकल (GMC) 2017 च्या बॅचमधील आहेत. मागील सहा महिन्यांपूर्वी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या 2021-2022 च्या बॅचमधील विद्यार्थ्याची 2017 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली. याचा एका विद्यार्थ्याने व्हिडीओ तयार केला. प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सीनियर्सकडून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला होता.


अँटी रॅगिंग नॅशनल हेल्पलाईनची मदत


विद्यार्थ्याने या घटनेची तक्रार 'अँटी रॅगिंग नॅशनल हेल्पलाईन' क्रमांकावर नोंदवली होती. सोबत व्हिडीओही जोडला होता. यासंदर्भात सोमवारी रात्री अधिष्ठातांना मेल पाठवण्यात आला होता. मंगळवारी दुपारी हा मेल चेक केला असता विद्यार्थ्याची रॅगिंग झाल्याची खात्री झाली. त्यानंतर लगेचच अॅंटी रॅगिंग समितीची बैठक बोलावून चर्चा करण्यात आली. तसेच सायंकाळी या प्रकरणी दोषी आढळलेल्या सर्व सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले.


ही बातमी देखील वाचा


RTMNU Extortion case : विद्यापीठातील खंडणी प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल ; आज नीलम गोऱ्हे व उच्चशिक्षण मंत्री पाटील यांची बैठक