नागपूर : दीडशे कोटीच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे  जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar)

  कारागृहात आहेत. त्यानंतर आता भाजपने सुनील केदार यांच्या समर्थकांना  घेरायल सुरवात केल्याचं दिसतंय. भाजपने  याची सुरवात नागपूर जिल्हा परिषदपासून केल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदमधील सुनील केदार यांच्या फोटोचा विषय असो की पदाधिकाऱ्यांचा कमिशनचा विषय, सध्या भाजपने केदार यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. त्यावर केदार समर्थक देखील भाजप विरुद्ध मैदानात उतरले.


जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर केदार यांचे वर्चस्व


नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या मातब्बर नेत्यांचा गड असताना देखील नागपूर जिल्ह्यावर सुनील केदार यांचे एकछत्री वर्चस्व आहे. नागपूर जिल्हा परिषद असो की जिल्ह्यातील 13  ही पंचायत समित्या, यावर सुनील केदार यांच्या गटाची सत्ता आहे. जिल्ह्यातील बहुतांश नगरपरिषद आणि नगर पंचायत सुनील केदार गटाच्या ताब्यात आहे. 


रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघ सुनील केदार बऱ्यापैकी नियंत्रित करतात. हेच भाजप नेत्यांना पचनी पडते नव्हते. त्यामुळे वीस वर्ष जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याच्या प्रकरणात भाजपने हात घालत सुनील केदार यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढा लढणाऱ्यांना कायदेशीर मदत केली आणि  सुनील केदार यांना कारागृहाची हवा दाखली. 


नागपूर जिल्हा परिषदेच्या भ्रष्टाचारावर बोट


मात्र या घटनेने सुनील केदार यांचे कार्यकर्ते आणखी चवताळून उठले. त्यामुळे सुनील केदार यांच्यानंतर आता त्यांचे कार्यकर्ते आणि भाजप हा नवीन संघर्ष नागपूर जिल्ह्यात सुरु झाल्याचं दिसतंय. त्याची सुरवात भाजपने काँग्रेसची सत्ता असलेल्या नागपूर जिल्हा परिषदपासून झाली. नागपूर जिल्हा परिषदच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत भाजप समर्थकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या भष्ट्राचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आणि सुनील केदार यांच्या समर्थकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.


जिल्हा परिषदेतील फोटो काढण्याची मागणी


भाजप इतक्यावरच थांबली नाही तर नागपूर जिल्हा परिषदमधील लावलेले सुनील केदार यांचे  फोटो काढण्यात यावे अशी मागणी भाजपच्या जिल्हा परिषदमधील विरोधी पक्ष नेते आतिष उमरे यांनी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. तर त्याला लगेच सुनील केदार समर्थक जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकूडे यांनी विरोध केला. 


केदार समर्थकांनी कुणबी समाजाच्या बैठकीत सुनील केदार यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला. सुनील केदारांसाठी कुणबी कार्डच्या माध्यमातून दबाव निर्माण करायला केदार समर्थकांनी सुरवात केली. त्यामुळे भाजपची अडचण झाली.


सुनील केदार कारागृहात गेल्याने त्यांचे समर्थक भाजपवर चिडून आहे. तर केदार कारागृहात गेल्यानंतरही केदार समर्थकांची आक्रमता कमी झाली नसल्याने भाजप आणखी आक्रमक झाली आहे. त्यामुळे  सध्या नागपूर जिल्ह्यात भाजप विरुद्ध सुनील केदार समर्थक यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.  


ही बातमी वाचा: