नागपूरः  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने केलेल्या 20 टक्के शुल्कवाढीला विविध संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, युवा ग्रॅज्युएट फोरम, भाजयुमो विद्यार्थी आघाडीने शुल्कवाढीला कडाडून विरोध करत ती लगेच मागे घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. शुल्कवाढ मागे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


20 टक्के शुल्कवाढ


पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विद्यापीठाचा हा निर्णय आला आहे. शैक्षणिक सत्र 2022-23 साठी थेट 20 टक्के तर 2023-24 शैक्षणिक सत्रासाठी शुल्कामध्ये आणखी 7 टक्के वाढ करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांकडून 20 टक्के वाढीव शुल्क आकारावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आता अनुदानित महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि गृहविज्ञानाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 18 हजार 547 रुपये शिकवणी शुल्क तर 12 हजार 365 रुपये प्रयोगशाळा शुल्क भरावे लागतील.


एलएलबीच्या शुल्कातही वाढ


खासगी महाविद्यालयात बी.ए.एल.एल.बी. करण्यासाठी आता 41 हजार 261 रुपये शिकवणी शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एम.ए. मास कम्युनिकेशनसाठी आता 19 हजार 260 रुपये शिकवणी शुल्क तर 1649 रुपये प्रयोगशाळा शुल्क भरावे लागणार आहे. विद्यापीठाने केलेल्या या शुल्कवाढीला आता कडाडून विरोध होत आहे. विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घ्यावी अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे, असा इशाराही देण्यात आला आहे. विद्यापीठामध्ये अनेक प्रश्न आहेत. त्यावर अनेकदा निवेदन देऊनही विद्यापीठ ते प्रश्न सोडवत नाही. मात्र, शुल्कवाढीचा निर्णय इतक्या तातडीने कसा घेतला? सातत्याने खासगी महाविद्यालयाच्या हिताचे निर्णय विद्यापीठात होताना दिसत आहेत.


Nagpur : वर्षात चारवेळा होणार पुनरिक्षण, 'या' तारखांना वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांना करता येणार नोंदणी


भाजयुमोचेही प्र-कुलगुरूंना निवेदन..!


भारतीय जनता युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, नागपूर महानगरातर्फे आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु संजय दुधे यांना विद्यापीठातर्फे वाढीव फी संदर्भात निवेदन देण्यात आले. विद्यापीठाद्वारे परत एकदा फी  वाढविण्यात आली आहे. या संकटकाळात विद्यार्थी व पालकांना अधिक सवलत व मदत देण्याऐवजी 20% एवढी प्रचंड शुल्कवाढ करणे असंवेदनशील व आश्चर्यकारक आहे. यासोबतच पूढील वर्षी होणारी 7% शुल्कवाढ देखील आताच घोषित करण्यामागे विद्यापीठाचा हेतू समजण्यापलिकडचा आहे. या विषयावर भा.ज.यु.मो. विद्यार्थी आघाडी तर्फे आज विद्यापीठाचे प्र-कुलगुरु संजय दुधे निवेदन देण्यात आले व त्वरित ही शुल्कवाढ रद्द करण्यात यावी असा इशारा देखील देण्यात आला. जर विद्यापीठाने ही शुल्कवाढ कमी केली नाही तर भविष्यात भा.ज.यु.मो. विद्यार्थी आघाडी, नागपूर शहर आक्रमक आंदोलनाची भूमिका घेईल व त्याला सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जवाबदार राहील असे वक्तव्य भा.ज.यु.मो. विद्यार्थी आघाडी, नागपूर शहर संयोजक संकेत कुकडे यांनी केले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित शहर संपर्कमंत्री मनीष मेश्राम, विद्यार्थी आघाडी नागपूर शहर संयोजक संकेत कुकडे, सह-संयोजक गौरव हरडे, सुभाष खेमानी, आशिष मोहिते, प्रणित पोचमपल्लीवार, आनंद गुप्ता, जतीन कनोजे, कौस्तुभ दाणी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


Nagpur : मद्यार्काची 'पुष्पा स्टाईल' तस्करी, दोन हजार लिटर 'स्पिरिट' जप्त


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI