नागपूरः पुष्पा या सुपरहिट चित्रपटात रक्तचंदन तस्करीसाठी वापरण्यात आलेली 'पुष्पा स्टाईल' मद्यार्क तस्करांनी वापरली असून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी सुर आहे. तस्करीसाठी सतत नवीन पद्धत वापरत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाली तस्करी रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशाच प्रकारच्या तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून तब्बल 2 हजार लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरिट) जप्त केला आहे.


उमरेड मार्गावरुन ट्रकमध्ये छुप्या पद्धतीने शुद्ध मद्यार्काची तस्करी करण्यात येत असल्याची टीप राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. याचा मागोवा घेत विभागातील कर्मचाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात वडद परिसरात सापळा रचून 200 लिटर क्षमतेचे दहा ड्रम म्हणजेच 2000 लिटर शुद्ध मद्यार्क जप्त केला आहे. विशेष म्हणजे तस्करीसाठी वापरलेल्या या ट्रकमध्ये ड्रायव्हरची केबिन आणि पाठीमागची ट्रॉली यादरम्यान विशेष कप्पा (जागा) बनवून मद्य तस्करी केली जात होती. 


NMC Elections : विविध उपक्रमांद्वारे प्रभागात माहोल निर्मितीला सुरुवात, नोव्हेंबरमध्ये मनपा निवडणुकीचे संकेत


...म्हणून आला संशय


जेव्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संशयाच्या आधारावर ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा ट्रकची एकूण लांबी खूप जास्त असतानाही त्याची ट्रॉली तुलने कमी लांबीची असल्याचे पथकाच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांनी ट्रकच्या ट्रॉलीमध्ये चढून तपासणी केली. तेव्हा ड्रायव्हरची केबिन आणि ट्रॉलीच्या मध्ये विशेष कप्पा बनवण्यात आल्याचे दिसून आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नटबोल्ट उघडून त्या भागाची पाहणी केली. तेव्हा त्या ठिकाणी दहा ड्रम शुद्ध मद्यार्क म्हणजेच स्पिरिट लपवण्यात आल्याचे उघड झाले. दारूची अवैध निर्मिती करण्यासाठी हे स्पिरिट वापरले जाणार होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे तर इतर आरोपी फरार झाले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख रुपयांचा मुद्देमाल याप्रकरणी जप्त केला आहे.


तस्करांवर विभागाची करडी नजरः अधिक्षक


तस्कर तस्करीसाठी सतत नवनवीन आयडीया वापरत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आव्हान वाढले आहे. अनेकवेळा हे तस्कर निसटून जातात. मात्र जिल्ह्यातील तस्करीवर आळा घालण्यासाठी आपण कंबर कसली असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरेंद्र मनपिया यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.


Maharashtra High Alert : मुंबईत नाकाबंदी, समुद्र किनारच्या जिल्ह्यात झाडाझडती, संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी


अवैद्य मद्यनिर्मितीचे आव्हान


शुद्ध मद्यार्काची एवढ्या मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध पद्धतीने होणारी तस्करी हे जिल्ह्यात सुरु अवैध मद्यनिर्मिती सुरु असल्याचे अधोरेखीत करते. त्यामुळे अशा प्रकारच्या तस्करीवर आळा घालण्यासह जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध मद्य निर्मिती अड्ड्यावरही अंकुश लावण्याची गरज असल्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.