नागपूर : गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य यांच्या दरम्यानच्या पावन नात्याचा दिवस असतो. मात्र गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नागपुरात गुरु-शिष्य परंपरेच्या पावित्र्याला तडा गेला आहे. राज्य सरकारच्या क्रीडा प्रबोधिनीत शिष्य आणि गुरु एकमेकांना शिव्या देत एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्वात दुर्दवी बाब म्हणजे या लाजिरवाण्या घटनेसाठी मुख्य कारण ठरलाय प्रबोधनीत खेळाडूंना दिलं जाणारं जेवण.

नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलात राज्य सरकारची क्रीडा प्रबोधिनी चालविली जाते. इथे हॅण्डबॉल आणि एथलेटिक्सचा प्रशिक्षण घेणारे राज्यभरातले 40 खेळाडू वसतिगृहात राहतात. जून महिन्यापासून वसतिगृहात जेवणाचा दर्जा खालावल्याचा इथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि खेळाडूंचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी दिल्या आहेत.

अधिकारी त्यांच्या तक्रारीकडे काहीच लक्ष देत नसल्यामुळे दोन दिवसांपूर्वी प्रबोधिनीच्या मेसमध्ये खेळाडूंना वाढण्यात आलेल्या वरणात किडे तरंगत असल्याचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी संध्याकाळी नागपूर विभागाचे क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर वसतिगृहात पोहोचले. तिथे त्यांनी मेसची तपासणी करत तिथल्या दर्जा सुधरविण्यासंदर्भात मेस चालकाला सूचना केल्या.

उपसंचालक सुभाष रेवतकरांच्या पुढ्यातचं खेळाडूंच्या एका महिला प्रशिक्षकाचा मेस चालकासोबत वाद झाला आणि तो वाद एकमेकांना शिव्या देण्या इतपत वाढला. उपसंचालक रेवतकर यांचा दावा आहे की परिस्थिती होता बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी हस्तक्षेप करत खेळाडूंच्या प्रशिक्षिकेला शांत राहण्याच्या सूचना केल्या. त्यांच्या याच सूचनांचा चुकीचा अर्थ तिथे उपस्थित काही खेळाडूंनी घेतला आणि त्यांनी रेवतकर यांना तुम्ही मेस चालकाची बाजू का घेता असे प्रश्न विचारात शिवीगाळ करणे सुरु केले. काही खेळाडू तर रेवतकर यांच्या अंगावर ही धावून गेले. यानंतर रेवतकर यांचा पारा चढला आणि त्यांनी राज्याच्या मंत्र्यांपासून तर खेळाडूंची आणि गुरु पौर्णिमेच्या सणाची ही ऐशी तैशी करत आपला राग व्यक्त केला.

बराच वेळ हा वाद चालल्यानंतर खेळाडूंनी मानकापूर पोलीस स्टेशन गाठून सुभाष रेवतकर यांच्या विरोधात मारहाण आणि शिवीगाळ करत धमकावल्याची लेखी तक्रार दिली. तर रेवतकर यांनीही खेळाडूंच्या विरोधात अनुशासनात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान यापुढे क्रीडा विभाग आता या प्रकरणी क्रीडा प्रबोधिनीच्या मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाची चौकशी करणार आहे.

मात्र, गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरु आणि शिष्याच्या नात्याची लाज काढणारी जी वर्तवणूक खेळाडू आणि क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांसोबत केली आहे. ती नक्कीच लाजिरवाणी बाब आहे.