Abu Azmi on Muslim Reservation: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्दावरुन राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतांना, त्यात आता मुस्लिम आरक्षणाची (Muslim Reservation) मागणी जोर धरू लागली आहे. आज विधिमंडळाच्या शेवटच्या दिवशी समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) आमदार अबू आझमी (Samajwadi Party Abu Azmi) यांनी विधानभवन परिसरात मुस्लीम समाजालाही आरक्षण दिलं पाहिजे. अश्या आशयाचे बॅनर झळकावत आंदोलन केले. आमचा मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुस्लीम समाजाच्या आरक्षणाबद्दल आज कोणी बोलायला देखील तयार नाही. आम्ही आमची मागणी लावून धरली असता आम्हाला बोलू देखील देत नाही. असा आरोप त्यांनी केला. राज्यात ज्याप्रकारे आंदोलने होत आहेत. असे आंदोलन जर मुस्लीम समाजाने केले असते तर आम्हाला गोळ्या झाडून मारले असते. अशी भीती देखील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी बोलून दाखवली. ते नागपुरात बोलत होते.
मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण द्यावे- अबू आझमी
एकीकडे मराठा आरक्षणची मागणी जोर धरत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही, तर आम्हाला नव्याने आंदोलन उभारावं लागेल. असा इशाराच मनोज जरांगेनी सरकारला दिला आहे. असे असतांना काल 19 डिसेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं जाहीर केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अंजघडील संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून मराठाविरुद्ध ओबीसी या वादाने देखील तोंड वर काढले आहे. मराठा आरक्षणाचे पडसाद यंदाच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील उमटतांना दिसले. अशात मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवता यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला वेळ द्यावा आणि उपोषण मागे घ्यावं,असा ठराव सर्वपक्षीय नेत्यांनी बैठकीत घेतला. मात्र या बैठकीत समाजवादी पार्टीला निमंत्रण न देताच ही बैठक पार पडली. त्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत टीका केली.
आरक्षणासाठी आंदोलन केल्यास गोळ्या झाडून मारले जाईल
विधीमंडळात मराठा आरक्षणसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात मराठा आरक्षण कसे देता येईल यासाठी पूर्ण प्रयत्न ते करत आहेत. मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळावे ही आमची देखील आग्रही भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचं देखील जाहीर केलं आहे. असे असतांना मात्र मुस्लीम समाजाच्या 5 टक्के आरक्षणा संदर्भातील मागणीला मुख्यमंत्र्यांनी दुधातल्या माशी प्रमाणे चर्चेतून काढून टाकले आहे. या बाबतीत कुणीही एक शब्द उच्चारायला तयार नाही. सोबतच विरोधी पक्षातील लोक देखील यात कुठलीही भूमिका स्पष्ट करत नाही. आम्ही आमची मागणी घेऊन सभागृहात आवाज उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचे म्हणने देखील कोणी ऐकून घेत नाही. एक अल्पसंख्यांक समाजावर हा अन्याय सरकार करत आहे. मुस्लीम समाजाने आरक्षणासाठी बऱ्याचदा आंदोलन केले, पण न्याय मिळाला नाही. आता समाजाने जर पुन्हा आंदोलन केल्यास आम्हाला गोळ्या झाडून मारले जाईल, अशी भीती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी बोलतांना व्यक्त केली.
मुस्लीम आरक्षणावर चर्चा करणार आहात का नाही?
ज्यावेळी मराठा समाजाला 16 टक्के आणि मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचे ठरले होते. उच्च न्यायालयाने देखील त्याला हिरवी झेंडी दाखवली होती. असे असतांना सुद्धा याबाबत निव्वळ टाळाटाळ सुरू आहे. हा या देशातील तमाम मुस्लिम समाजावर अन्याय असून भारतीय संविधानाच्या चिंध्या केल्या जात आहे. जे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेत आहेत. या सर्वांना केवळ मुसलमानांची मतं हवी आहेत. राजकीय फायद्यापोटी ते यावर बोलत देखील नाही. मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही कधी मुस्लीम आरक्षणावर चर्चा करणार आहात का नाही ? असा सवाल देखील अबू आझमी यांनी उपस्थित केला.
इतर महत्वाच्या बातम्या: