जालना : मराठा आरक्षण (Maratha Reservation) जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका (Elections) होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता असणार असल्याच्या चर्चेवर बोलतांना जरांगे यांनी हे वक्तव्य केले आहे. 


फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. तर, दुसरीकडे फेब्रुवारीपर्यंत राज्यात आचारसंहिता लागेल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, मराठा आरक्षण दिल्याशिवाय राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापण्याची शक्यता आहे.


24 डिसेंबरच्या आधीच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार 


दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, “आचारसंहिता कधी लागतील मला माहित नाही. मात्र 24 तारखेच्या आतच निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका लागो की 25 ला लागो, आमचा निर्णय 24 डिसेंबरलाच होणार आहे. आम्हाला आरक्षण दिलं नाही तर निवडणुका होत नसतात. त्यामुळे 24 डिसेंबरच्या आधीच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे. फेब्रुवारी आता खूप लांब आहे असं जरांगे म्हणाले.


रक्ताच्या नातेवाईकासंदर्भात सरकारच्या अटी-शर्ती काय?


मनोज जरांगे यांच्या पाचव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान त्यापूर्वी बोलतांना जरांगे म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणा दाखवणे आता आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी घेणं सोपं नाही. आमच्यातील समाधान प्रमाणे दोन शब्द घेणे आवश्यक होतं, ते ते घेतील. सरकारच्या कानावरती याबाबत मी घातले आहे. रक्ताच्या नातेवाईकासंदर्भात सरकारच्या अटी-शर्ती काय आहेत हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. माझे रात्री सरकारशी बोलणे झाले असून, मी कोणाशी बोललो हे 24 तारखेपर्यंत स्पष्ट करणार," असल्याचे जरांगे म्हणाले.


मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार


समाजाशी संवाद साधण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आजपासून पुन्हा जातोय. सर्वांना शांततेचे आवाहन करण्यासाठी जात आहे, समाजाला डाग लागू द्यायचा नाही 23 तारखेला घराघरातील मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार आहे. सरकार आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं वाटते, मुख्यमंत्र्यांनी निर्णय मोठा घेतला त्यांच्या धाडसाचे कौतुक असल्याचे देखील जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठा आरक्षण मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे