Nagpur Explosives Factory Blast : नागपूरमधील काटोल तालुक्यातील चाकडोह, बाजारगाव येथे असलेल्या सोलर इंडस्ट्रीज इंडिया (Nagpur Explosives Factory Blast) कंपनीत झालेल्या स्फोट प्रकरणी आज राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी, मृतांच्या मुलांच्या शाळेची जबाबदारी सरकार  घेणार असल्याची घोषणा आज सरकारकडून विधिमंडळात करण्यात आल्या आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधान परिषदेत घोषणा केली. 


संरक्षण क्षेत्राला स्फोटके आणि शस्त्रात्रे पुरवणाऱ्या तसेच सुमारे 30 देशांना निर्यात करणाऱ्या सोलर ग्रुपच्या बाजारगाव येथील इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या आयुध निर्माण कारखान्यात काही दिवसांपूर्वी स्फोट झाला होता. या स्फोटाचा मुद्दा विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजला. त्यानंतर आज विधान परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी राज्य सरकारच्यावतीने मदतीची घोषणा केली. 


सरकारने कोणती घोषणा केली?


विधान परिषदेत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटले की, मृतातील कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. आठ जणांच्या कुटुंबीयांना पेन्शन मिळणार आहे. तर, एका कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळणार. मृतांमधील काही कामगार हे  ESI मध्ये नसल्याने  त्यांना पेन्शन मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 20 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली असल्याची माहिती खाडे यांनी सभागृहाला दिली. त्याशिवाय मुख्यमंत्री निधीतून 5 लाख रुपयातून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. त्याशिवाय, आणखी पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी म्हटले. 


नेमकं काय घडलं होतं? 


रविवार 17 डिसेंबरच्या  सकाळी 6 वाजेच्या दरम्यान कारखान्यातील कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 मध्ये नेहमी प्रमाणे काम सुरु करण्यात आले होते. या  ठिकाणी टी.एन.टी. फ्लेक्स चाळणीमध्ये चाळत (Sieving) असताना सकाळी  9 वाजता ही स्फोटाची घटना घडली. त्यामुळे कास्टींग प्रोसेस हाऊस नंबर 2 ही इमारत कोसळून त्या ठिकाणी काम करणाऱ्या एकूण 9 कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यानंतर येथील मलब्याखाली आणखी कामगार दबले असल्याने त्यांचा शोध घेतला असता त्यात आणखी तीन मृतदेह सापडले आहे.


या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की या मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आता डीएनए चाचणी करावी लागत आहे. घटनेच्या वेळी कंपनीतील कास्ट बूस्टर हाऊसमध्ये काही कामगार आणि एक शिकाऊ पर्यवेक्षक टीएनटी चाळत होते. स्फोटानंतर येथे काम करणाऱ्या अनेकांच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. कारखान्यातून शरीराचे अनेक अवयव जप्त केले आहेत. डीएनए चाचणीनंतर या मृतदेहांची ओळख  पटल्यानंतर या घटनेतील मृत्यूमुखी पडलेय कामगारांची निश्चित संख्या स्पष्ट होईल.