मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं, यावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.
महाराष्ट्रासाठी गेम चेंजर म्हणून दावा केला जाणाऱ्या या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याची मागणी करुन शिवसेनेने टायमिंग साधलं आहे. मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात निवेदन दिलं.
समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग ( विशेष प्रकल्प ) करत असून या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याबाबत शिंदे आग्रही आहेत.
समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन लवकरच केलं जाणार असून 87 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. आम्ही आधी नाव देण्याची मागणी केली असं सांगत भाजपच्या पवित्र्याबद्दल बोलण्यास शिंदे यांनी नकार दिला.
दुसरीकडे, समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला कोणत्या पक्षाने सुचवलेलं नाव लागणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव की वाजपेयींचं?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2018 04:45 PM (IST)
मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेत मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यासंदर्भात निवेदन दिलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -