नागपूर : एकीकडे राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्ष हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. त्यावर अद्याप तारीख पे तारीख सुरु आहे. त्यामुळे ओरिजनल शिवसेना कोणती व कोणाची हा पेच निर्माण झाला आहे. यावर शिंदे गट म्हणते खरी शिवसेना आमची तर भाजपही म्हणते शिंदेच खरे शिवसेनेचे वारसदार मात्र या गोंधळात नागपुरात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणूकीकडे उद्धव ठाकरेंचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर या गोंधळाच्या संधीचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाने अलिकडेच नागपूर आणि विदर्भात आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेही विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या गोंधळाचा फटका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कॉंग्रेसलाही नको उद्धव सेना?
अद्याप शिवसेना नेमकी कोणाची हे ठरलेले नाही. अशात दोन्ही गट 'आमचीच सेना ओरिजनल असा दावा करीत आहेत. अनेक पदाधिकारी त्यामुळे वेटींगवर आहे. कुठल्या शिवसेनेसोबत राहायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा गोंधळाच्या परिस्थितीत महापालिकेची (Nagpur Municipal Corporation) निवडणूक जाहीर झाल्यास उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी ते अडचणीचे ठरणार आहे. शिंदे (Eknath Shide) सेना आणि भाजपने युती जाहीर केल्याने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. नागपूर महानगरपालिकेत शिवसेनेची पकड नसल्याने काँग्रेसलाही शिवसेना सोबत नको असल्याने नागपूर महानगर पालिकेच्या आखाड्यात उद्धव सेना यांची अवस्था केविलवाणी होणार असल्याचे दिसून येते.
राज ठाकरे सहा दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा यांनी नुकताच विदर्भ दौरा आखला आहे. येत्या 17 सप्टेंबरपासून तब्बल 6 दिवस ते विदर्भात तळ ठोकून असणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका असलेल्या नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती शहरावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यांचे शिलेदार रात्रंदिवस एक करून त्यांच्या दौऱ्याची तयारी करीत आहे. मनसेची युती भाजप-शिंदे गटासोबत होऊ शकते, असेही राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे नागपुरात शिवसेनेसमोर वेगळीच डोकेदुखी उभी झाली आहे.
महाविकास आघाडीचे गणित बिघडले
राज्यात महाविकास आघाडीची (MVA) सत्ता असताना भाजपला पराभूत करण्यासाठी महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्या असे प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीसुद्धा यास संमती दिली होती. शिवसेनेलाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गरज आहे. त्यामुळे तडजोड करण्याची तयारीसुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली होती. मात्र नागपूरमध्ये काँग्रेसला महाविकास आघाडी मान्य नव्हती. सुरवातीपासूनच स्थानिक नेत्यांचा यास विरोध होता. शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी एक नगरसेवकाची पार्टी असल्याने त्यांच्यासाठी पन्नास जागा सोडण्यास काँग्रेसच्या नेत्यांचा नकार होता आणि आजही आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राष्ट्रवादीसोबतही आघाडी करण्यास विरोध आहे.
चतुर्वेदींवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा अविश्वास?
शिवसेनेचे नागपूरचे संपर्क दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant Chaturvedi) यांच्या नेतृत्वावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर कोणी बोलणीही करीत नव्हता. शिवसेनेसोबत आघाडी केल्यास फायद्यापेक्षा त्यांच्यात असलेल्या गटबाजीचा फटकाच अधिक बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपर्क प्रमुख आणि शहर प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया या तिघांचेही आपसात पटत नाही. दुसरीकडे प्रवीण बरडे यांच्याकडून पूर्व नागपूरचा मतदारसंघ काढून घेतल्याने शहर प्रमुखांमध्येही वाद निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेसोबत आघाडी करणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे होईल, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या