Nagpur News : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूरकरांना 2023 मध्ये पहिली भेट दिली जाणार आहे. ती म्हणजे अजनी चौकातील क्लॉक टॉवर. नागपूरच्या सौंदर्यीकरणासाठी महत्वाचे असलेले अजनी चौकातील क्लॉक टॉवर पुन्हा एकदा सुरु झाले आहे, या क्लॉक टॉवरच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असून, नव्या वर्षात, एका नव्या लूकमध्ये हे क्लॉक टॉवर नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे. तसेच लवकरच याठिकाणी 'आम्ही नागपुरी'चा सेल्फी पॉईंट उभारण्यात येणार आहे.
नागपूर शहराच्या (Nagpur) सौंदर्यात भर घालणारे अजनी चौकातील क्लॉक टॉवर कमी खर्चात आणि कमी वेळेत भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी लिमिटेड कंपनीद्वारे सुरु करण्यात यश आले आहे. सद्यस्थितीत या क्लॉक टॉवरच्या सौंदर्यीकरणाचे कार्य प्रगतीपथावर आहे. क्लॉक टॉवर इथे पाण्याचे नवीन कारंजे लावण्यात आले आहे. याशिवाय क्लॉक टॉवर परिसरात एक सुंदर अशी बाग (Nagpur Municipal Corporation) तयार करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास विविध रंगाच्या रोषणाईने हे क्लॉक टॉवर चौकातून ये-जा करण्याच्या वाहनचालकांचे, वाटसरुंचे लक्ष वेधून घेत आहे.
अजनी चौकातील मध्यवर्ती कारागृहाकडून प्राप्त जागेवर 2012 या वर्षी मनपाद्वारे क्लॉक टॉवर उभारण्यात आले. यासाठी अंदाजे 40 लक्ष रुपये खर्च करण्यात आले होते. 21 मीटर पॅराबोलिक स्टेनलेस स्टील स्ट्रक्चरवर 2 मीटर उंचीची प्रिझम शेप सॅटेलाईट वॉच लावण्यात आली होती. या घड्याळ आणि परिसराच्या सभोवतालच्या सौंदर्यीकरणाची देखभाल व दुरुस्तीसाठी दरबार वॉच यांच्याद्वारे वार्षिक खर्च 36 लक्ष रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्या मोबदल्यात संबंधित कंपनीला मनपा क्षेत्रात पाच गॅन्ट्री उभारुन 10 वर्षाकरता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याची मागणी होती. तत्कालीन स्थायी समितीद्वारे पाच गॅन्ट्री उभारुन तीन वर्षाकरता जाहिरात करण्याचे अधिकार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दरबार वॉच कंपनीद्वारे 10 वर्षाकरता जाहिरात देण्याचीच मागणी करण्यात आली. यावर एप्रिल 2022 मध्ये मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पुढाकार घेत या घड्याळासंदर्भात इतर एजन्सी शोधण्याचे निर्देश दिले होते.
भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी लि. कंपनीशी संपर्क साधण्यात आला. कंपनीचे अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन निरीक्षण केले. क्लॉक टॉवर दुरुस्तीसाठी कंपनीद्वारे 1 लक्ष 72 हजार 652 रुपये खर्च प्रस्तावित असल्याचे कळवण्यात आले. यास मनपा आयुक्तांनी मंजुरी प्रदान केली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या टी.टी.एल व कारखाना विभागाद्वारे पुरवण्यात आलेल्या टेलिस्कोपिक क्रेनचा वापर करुन 13 ते 21 जुलै या कालावधीत सतत 9 दिवस कार्य करुन मागील आठ वर्षापासून बंद असलेलं घड्याळ सुरु करण्यात यश आले आहे.
लवकरच 'आम्ही नागपुरी'चा सेल्फी पॉईंट
नागपूर शहराची शान वाढवणाऱ्या या क्लॉक टॉवर परिसरात सौंदर्यीकरणाचे केले जात आहे. देशात कुठेच या स्वरुपात क्लॉक टॉवर नसून अथक प्रयत्नांनी सुरु झालेलं घड्याळ पुन्हा बंद होऊ नये यादृष्टीने प्रणाली विकसित केल्या जात असून, क्लॉक टॉवर परिसरात 'आम्ही नागपुरी' असा सेल्फी पॉईंट तयार केला जात आहे.
ही बातमी देखील वाचा..