Teacher Constituency Election Nagpur : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा जवळपास साडेचार हजारांची वाढ मतदारांच्या संख्येत झाली आहे. 30 जानेवारीला मतदान झाल्यानंतर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. मतदान सकाळी 8 ते दुपारी 4 वाजताच्या दरम्यान होईल.


मागील निवडणुकीत 35,009 मतदार होते. यावर्षी 39,406 मतदारांची नोंदणी झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आचारसंहिता राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली. या निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) शिक्षक सेनेने आपला उमेदवार जाहीर केला आहे. गंगाधरराव नाकाडे हे महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार असतील, असे शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी जाहीर केले. भाजपकडून (BJP) उमेदवारीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. पण कॉंग्रेसचे अद्याप काहीही ठरले नसल्याचे चित्र आहे.


गाणार यांना पुन्हा संधी!


भाजपतर्फे माजी आमदार नागोराव गाणार यांनाच पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिक्षक परिषदेची बैठक आज होणार आहे. या बैठकीनंतर भाजपचा उमेदवार कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे. भाजपने प्रथमच शिक्षक आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार उतरवण्याचे ठरवले आहे. मराठवाडा येथील उमेदवार घोषित करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे जाहीर केले आहे. नागपूरचा निर्णय मात्र राखून ठेवला आहे.  


पोस्टर, बॅनर हटणार


नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शुभारंभ व उद्घाटनाचे कार्यक्रम करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे शिक्षकांवर प्रभाव पडेल, असे निर्णय सरकारला घेता येणार नाहीत, घोषित करता येणार नाहीत. अधिवेशनासाठी संपूर्ण शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री व विविध नेत्यांचे पोस्टर व बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे हे सर्व पोस्टर, बॅनर प्रशासनाकडून काढण्यात येणार आहेत. या निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर होणार आहे. पदवीधर संघाच्या निवडणुकीत नोटाचा समावेश नव्हता. या निवडणुकीत नोटासंदर्भात भारत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागण्यात येईल. त्याचप्रमाणे सुटीसंदर्भातही मार्गदर्शन मागण्यात येईल, असे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले.


निवडणूक कार्यक्रम..


उमेदवारी अर्ज 5 जानेवापारीपासून दाखल करता येईल. 12 जानेवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. 13 ला अर्ज छाननी होणार असून 16 जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षक भारतीने कॉंग्रेसला मदत केली होती. त्यामुळे आता कॉंग्रेसने शिक्षक भारतीला समर्थन जाहीर करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केली आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या वेळी 'तुम्ही आमच्या पाठीशी रहा, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही तुमच्या सोबत राहू', असे नाना पटोले यांनी म्हटले होते. ते बोलल्याप्रमाणे आम्ही तेव्हा तसेच केले. तेव्हा झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आणि इतर नेते होते. आता आमची निवडणूक आहे. त्यामुळे आम्ही सर्व कॉंग्रेस नेत्यांची भेट घेत आहोत आणि त्यांना त्यांच्या शब्दाची आठवण करून देत आहोत. पण आता कॉंग्रेस नेते, त्यातल्या त्यात नाना पटोले स्पष्ट बोलायला तयार नसल्याचे सांगण्यात येत आहे.


ही बातमी देखील वाचा...


वाशिम येथे राज्यस्तरीय शाळा बचाव परिषद ; शिक्षणतज्ञ डॉ. अनिल सद्गगोपाल करणार उद्घाटन