नागपूर : पंतप्रधान मोदी आणि अजित पवार यांचे एकमेकांबद्दल चांगले मत आहे. तसेच भाजप आणि अजित पवार यांचे प्रेम पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळेच देहूमधील मंचावरील प्रसंगाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही लोक वाद निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. देहूमधील कार्यक्रमातील मंचावरील वादानंतर भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर बोट ठेवत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.


देहूमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमात स्टेजवर पंतप्रधान मोदी यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. सूत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने अजित पवार यांचे नाव भाषणाकरता घेतले नाही. त्यानंतर पंतप्रधान स्वतः अजित दादांना भाषण करा असे संकेत करताना दिसले. त्यामुळे उलट राष्ट्रवादीने मोदींचे आभार मानले पाहिजे की मोदींनी अजित दादांना प्राथमिकता दिली, असे बावनकुळे म्हणाले.


भरसभेत राज्यपालांचे कान टोचले असते म्हणूनच भाजपने जाणीवपूर्वक अजित पवारांना बोलू दिलं नाही : रोहित पवार


मूळात अजित दादांनी वेळेच्या कारणाने भाषण केले नाही, कारण त्यांना मुंबईतही कार्यक्रम होते. यापूर्वी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने पोलीस भवन उद्घाटन आणि समृद्धी महामार्गाच्या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांना कशी वागणूक दिली होती ते पाहता देहूमध्ये तर पंतप्रधान स्वतः दादांना सांगत होते की भाषण करा, असेही बावनकुळे म्हणाले. 


"मला असे वाटते की कालच्या प्रसंगाबद्दल अजित दादांना आक्षेप नाही. उलट राष्ट्रवादीत कुणाच्या तरी पोटात दुखतंय की अजित दादा आणि भाजप एकमेकांशी प्रेमाने वागत आहे. पंतप्रधान आणि अजित दादा यांचे एकमेकांबाबत चांगले मत आहे आणि ते मत बिघडवण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट प्रयत्न करतो आहे," असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. "राष्ट्रवादीत अनेकांना आज ही वाटते की उद्या अजित दादा पुन्हा उलटसुलट करतील. त्यामुळेच निर्माण केला जात आहे," असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.


अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान : सुप्रिया सुळे
देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू नदेणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. देहूतल्या मंदिर शिळा लोकार्पण सोहळा मंगळवारी (14 जून) पंतप्रधानांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलं. पण या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही. यावरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 


खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही."