नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महत्त्वाचा मानला जाणारा विजयादशमी उत्सव आज नागपुरात उत्साहात साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. राधाकृष्णन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर शस्त्रपूजन पार पडले, यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अनेक महत्वांच्या बाबींवर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, यंदा संघ स्थापनेच्या 100 व्या वर्षात प्रवेश करत आहे. देश बलशाली व्हायचा असेल तर प्रजेत चारित्र्य असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय चारित्र्याच्या जोरावर देश मोठा होतो. बांगलादेशमध्ये अनुकुल चंद्र ठाकूर यांनी तेच प्रयत्न केले होते, असं यावेळी त्यांनी म्हटलं आहे. 


इस्रायल-हमास युद्धावर मोहन भागवत काय म्हणाले?


यादरम्यान त्यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाबाबत वक्तव्य केले आहे. भारताची प्रगती कशी होत आहे हेही त्यांनी सांगितले. आरएसएस प्रमुख म्हणाले, "इस्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. आपला देश पुढे जात आहे कारण तो सर्वांना मदत करतो आहे. जे शत्रू आहेत अशांनाही वेळप्रसंगी आपला देश मदत करतो.जगात अशा शक्ती आहेत ज्यांना भारताने पुढे जाऊ नये असे वाटते.  जगातील देशांचा असा स्वभाव नाही. यामुळेच भारत पुढे जात आहे."


आज मानव तीव्रतेने भौतिक प्रगती करत आहे. विज्ञान आमच्या जीवनाला सोयीस्कर बनवत आहे. मात्र, मानवी स्वार्थ अहंकार संघर्ष निर्माण करत आहे. इस्रायलआणि हमास यांचा युद्ध कोणत्या दिशेने जाईल, किती विनाश करेल याची चिंता आहे. आपला देश पुढे जात आहे. तंत्रज्ञान विज्ञान सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. समाजाची समजूतदारी ही वाढत आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे.. योग जगभरात मान्यता मिळवत आहे. पर्यावरणाबद्दलचे भारताचे विचार जग स्वीकारत आहे. भारताची प्रतिष्ठा वाढली आहे, देशाचे सामरिक बळ वाढले आहे. देश पुढे जात आहे. शासन, प्रशासन, सैन्य, युवा हे सर्व करत आहेत. ही प्रगती चालत राहिली पाहिजे. ही प्रगती थांबायला नको. मात्र काही आव्हान ही आपल्या समोर आहे. काही आव्हान फक्त संघ, हिंदू समाज किंवा भारतासमोर नाही तर संपूर्ण जगासमोर आहे. भारत पुढे जाऊ नये असे प्रयत्न सुरू आहे. भारताला दाबण्याचे प्रयत्न ते करत आहे, ज्यांना भारत पुढे जाईल, आपल्याला आव्हान बनेल अशी चिंता वाटत आहे, ते अडथळे आणत आहे, असंही यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 


हिंदूंनी संघटित आणि मजबूत राहिले पाहिजे


ते लोक निवडलेले सरकार खाली खेचण्याचे काम ही करतात. असे व्हायला नको, मात्र असे होत आहे. भारताच्या शेजारी बांग्लादेशात हेच घडले. तिथे हिंदू समाजाला लक्ष्य करत अत्याचार करण्यात आले. हिंदू समाजाने संघटित होऊन प्रतिकार केले. त्यांना भारत सरकारने मदत केली पाहिजे. बांगलादेशातील हिंदूंना जगभरातील हिंदू समाजाकडून ही मदतीची आवश्यकता आहे. भारताच्या हिंदू समाजाला लक्षात यायला हवे, दुर्बल राहणे नुकसानीचे आहे. जिथे ही हिंदू आहे, त्यांनी सशक्त राहिले पाहिजे. सशक्त राहून अत्याचारी बनू नये, मात्र सशक्त बनून राहिले पाहिजे, असंही सरसंघचालक पुढे म्हणालेत.


बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत मोहन भागवत म्हणाले, "बांगलादेशात स्थानिक कारणांमुळे हिंसक सत्तापालट झाला. त्यादरम्यान पुन्हा एकदा हिंदू समाजातील लोकांवर अत्याचार झाले. तेथील हिंदूंनी त्या अत्याचाराचा निषेध केला. यावेळी समाज संघटित झाला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी घराबाहेर पडला, त्यामुळे थोडे संरक्षण होते. पण जोपर्यंत हा अत्याचारी मूलतत्त्ववादी स्वभाव आहे, तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार राहणार आहे."


जम्मू काश्मिरच्या निवडणुकीवर केलं भाष्य


"जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेत निवडणुका पार पडल्या. जगभरात भारताची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा वाढली आहे. आमचा योग जगभरात फॅशनेबल होत आहे. जग वसुधैव कुटुंबकम स्वीकारत आहे. पर्यावरणाविषयीची आमची दृष्टी जगभर स्वीकारली जात आहे. देश अनेक बाबतीत पुढे जात आहे आणि प्रत्येकाकडून प्रयत्न केले जात आहेत.


नागपुरात विजयादशमीच्या निमित्ताने आरएसएसच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इस्रोचे माजी प्रमुख के सिवन उपस्थित होते. पद्मभूषण आणि इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन हे देखील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.