नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जवानांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवरुन सरकारला घेरलं. देशात कोणतं युद्ध सुरु नाही मग सीमेवर जवान शहीद का होतं आहेत? असा प्रश्न भागवत यांनी उपस्थित केला.


भागवत प्रहार समाज जागृती संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. देशात स्वातंत्र्य नव्हते त्यावेळी देशासाठी जीव अर्पण करण्याचा काळ होता. स्वातंत्र्यानंतर युद्धादरम्यान सीमेवर जवान शहीद होतात. एखादं युद्ध झालं किंवा तशी परिस्थिती उद्धवली तर जवान आपल्या जीवाजी बाजी लावून देशासाठी लढतात. त्यावेळी जवान आपल्या जीवाची पर्वाही करणार नाहीत, मात्र तशी कोणतीही परिस्थिती सध्या देशात नाही, असं भागवत म्हणाले.


देशात सध्या कोणतंही युद्ध सुरु नाही, तरीही सैनिक शहीद होत आहेत. आपण आपलं काम नीट करत नाही, हे त्याचं मुख्य कारण आहे, असं मोहन भागवत म्हणाले. कोणतही युद्ध सुरु नाही, मग सैनिकांचे प्राण जाण्याचं कारण नाही. मात्र तरीही जवान शहीद होत आहेत. या घटना रोखण्यासाठी आणि देशाला महान बनवण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे.


सीमेवर जवान शहीद होत आहेत, याबाबत भागवत यांनी चिंता व्यक्त केली. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादावर नियंत्रण मिळवल्याचं सरकार सांगत आहे. मात्र अशावेळी मोहन भागवतांचं वक्तव्य आल्याने सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या सुरुवातीच्या तीन वर्षात म्हणजे 2014 ते 2017 मध्ये 812 दहशतवादी हल्ल्यातं 62 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 183 जवान शहीद झाले.