नागपूर : सीएए आणि एनआरसीच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रेशीमबागेत सभा पार पडली. संघ मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर पार पडलेल्या सभेत त्यांनी संघावरच जोरदार टीका केली. ज्यावेळी आरएसएसवर बंदी घातली जाईल तेव्हाच देशातला मनुवाद संपेल असं आझाद म्हणाले. यावर स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक डॉ. राजेश लोया यांनी प्रतिक्रिया देत पलटवार केला. चंद्रशेखर रावण यांची मागणी त्यांच्या समजण्याच्या कुवतीनुसार केल्याचं ते लोया म्हणाले.


आज रेशीमबाग मैदानावर भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यात चंद्रशेखर रावण यांनी मनुवादाचा अंत करायचा असल्यास संघावर बंदी आणावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता संघाने पलटवार करत चंद्रशेखर रावण यांच्या मुद्द्यांच्या आकलनावर तसेच इतिहासाच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघ कधीच राजकारणात उतरत नाही, जे राजकारणात आहेत, त्यांचे वेगवेगळे पक्ष आहे. मनुवादाचं नाव घेऊन रावण जे काही सांगत आहे, तो त्यांचा गैरसमज आहे. ते मनुवाद आणि इतर जे काही बोलत आहेत, ते सर्व भ्रम निर्माण करण्यासाठी बोलत असल्याची प्रतिक्रिया डॉ. राजेश लोया यांनी दिली.

संघाच्या अंगणात भीम आर्मीचा मेळावा; अटी-शर्थींसह चंद्रशेखर आझाद यांच्या सभेला न्यायालयाची परवानगी

चंद्रशेखर आझाद यांनी अभ्यास करायला हवा होता -
अगोदर आपल्याकडची वर्णव्यवस्था काय होती, कशासाठी होती हे रावण यांनी समजून घ्यायला हवे होते. मगच, त्यांनी लोकांना सांगायला हवे होते. मात्र, त्यांनी असे काहीच केलं नाही, असे डॉ लोया म्हणाले. रावण यांना संघाचा इतिहास माहीत नाही. कार्य माहीत नाही, संघ कशी सेवा करतो हे काहीच माहीत नाही. रावण सारखे लोक काहीतरी सांगतात आणि काही तरी बोलतात. मात्र, त्यांच्या बोलण्यात तथ्य नसल्याचा पलटवार लोया यांनी केला. दरम्यान, चंद्रशेखर रावण यांच्या भीम आर्मीचा मेळावा ज्या रेशीमबाग मैदानात पार पडला, तिथून एक किलोमीटर अंतरावर सक्करदरा चौकात आज सीएएच्या समर्थनार्थ लोक जागृती सभा पार पडली. त्यात मोठ्या संख्येने संघाचे स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Bhim Army | सीएएच्या विरोधात भीम आर्मीचा सोहळा, दुसरीकडे सीएएच्या समर्थनार्थ समर्थन | नागपूर