नागपूर : सीएए आणि एनआरसी विरोधात नागपूरच्या रेशीमबागेत भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे. भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. नागपूर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर या मेळाव्याला परवानगी नाकारली होती. मात्र, उच्च न्यायालयात भीम आर्मीला काही अटी शर्थी घालत मेळाव्याला परवानगी दिली आहे. दुपारी 3 ते संध्याकाळी 7 असा हा मेळावा पार पडणार आहे.





भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर आझाद यांनी एक ट्वीट करत आज होणाऱ्या भीम आर्मीच्या मेळाव्याबाबत माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'नागपूरच्या रेशमबागमध्ये आरएसएसच्या मुख्यालयासमोर तिरंगा फडकावणार' तसेच त्यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं आहे की, '22 फेब्रुवारीला नागपूरात सभा घेण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे.'





ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'मी 2 वाजता रेशमबाग नागपूर येथे येत आहे. खोट्या राष्ट्रवादाची संघटना आरएसएस ज्यांनी आजपर्यंत तिरंग्याला सन्मान दिला नाही. आम्ही त्यांच्या मुख्यालयासमोर तिरंगा फडकावणार आहोत. माझी अशी इच्छा आहे की, सर्व साथीदारांनी तिरंगा घेऊन रेशमबागमध्ये जमावं आणि सांगावं यांना की, यांच्या भगव्या समोर आपला तिरंगा भारी आहे.' एक अन्य ट्वीटला चंद्रशेखर आझाद यांनी रिट्वीट केलं आहे. ज्यामध्ये लिहलं आहे की, '22 फेब्रुवारी नागपूरमध्ये जनसभा घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे.'


ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी नागपूरमध्ये जनसभा घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. 2 ते 5 वाजल्यापासून रेशीमबाग नागपूरमध्ये जनसभा होणार आहे.' दरम्यान, मागील काही दिवसांपासून सीएएच्या मुद्यावरून चंद्रशेखर आझाद यांनी भाजपवर निशाणा साधत आहेत. त्याचबरोबर चंद्रशेखर यांनी 23 फेब्रुवारीला भारत बंद पुकारण्याची घोषणा केली आहे.


संबंधित बातम्या : 


महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री बहुजन समाजाचा : चंद्रशेखर आझाद