Rashtriya Swayamsevak Sangh: राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (Rashtriya Swayamsevak Sangh) गणवेशांनंतर आणखी काही मोठे बदल होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. हे बदल संघाच्या स्वयंसेवक प्रशिक्षण प्रणालीत (RSS) असणार आहेत. संघात कार्यकर्ता घडविणारी प्रक्रिया म्हणजे, संघाचे 'संघ शिक्षा वर्ग'. आता संघानं याच संघ शिक्षा वर्गाची प्रणाली आणि त्याचा अभ्यासक्रम बदलवण्याचा निर्णय घेतला आहे. संघ शिक्षा वर्ग म्हणजे नेमकं काय? संघाच्या एकूण कार्यप्रणालीत त्याचं महत्व काय? आणि त्यात कोणते बदल होणार? सविस्तर जाणून घेऊयात... 


संघाचे स्वयंसेवक अनुशासित राहून संघटनेनं दिलेलं काम चोख पूर्ण करतात. असे संघ स्वयंसेवकांबद्दल अनेक लोकं बोलत असतात. मात्र, संघात हे ध्येयनिष्ठ, संघटननिष्ठ कार्यकर्ते कसं घडविलं जातात. तर त्याचं उत्तर आहे संघाची दैनंदिन पातळीवर होणारी शाखा आणि विशिष्ट स्वरूपात घेतले जाणारे स्वयंसेवकांचे प्रशिक्षण वर्ग. संघात या प्रशिक्षण वर्गाना 'संघ शिक्षा वर्ग' म्हणतात. 


संघ शिक्षा वर्ग म्हणजे नेमके काय?


संघाच्या स्थापनेच्या 2 वर्षानंतर म्हणजेच, 1927 पासून संघ शिक्षा वर्ग होतात. 
त्या काळात या वर्गाना "ऑफिसर्स ट्रेनिंग कॅम्प" म्हणजेच OTC म्हंटले जायचे. 
स्वातंत्र्य पूर्वीच्या काळात 40 दिवसांच्या प्रशिक्षणात सैन्यासारखं प्रशिक्षण स्वयंसेवकांना दिलं जायचं. 
स्वातंत्र्य नंतर OTC ला 'संघ शिक्षा वर्ग' संबोधलं गेलं आहे.  
स्वातंत्र्योत्तर काळात प्रशिक्षणात शारीरिक आणि बौद्धिक प्रशिक्षणावर जोर असायचा. 
नंतर हळूहळू त्यात आपत्ती व्यवस्थापन, ग्रामविकास, कृषी, प्रचार, प्रसार माध्यम असे नवे विषयही आले आहेत. 


संघ शिक्षा वर्गात स्वयंसेवकांना तीन वर्षांचं प्रशिक्षण दिलं जातं. प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचं प्रशिक्षण देश भरात अनेक ठिकाणी पार पडतात. मात्र, तिसऱ्या वर्षाचं प्रशिक्षण घेण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या स्वयंसेवकांना नागपुररातील रेशीमबागेत यावं लागतं. तृतीय वर्षाचं प्रशिक्षण आधी चाळीस दिवसांचं असायचं. सध्या त्याचा कालावधी 25 दिवसांचा असतो.     


संघ शिक्षा वर्ग ही पूर्णपणे संघात कार्यकर्ता घडविणारी प्रक्रिया असून ती काळाच्या गरजेप्रमाणे नेहमीच बदलत गेली आहे. मात्र, संघ शिक्षा वर्गाची पद्धत आणि कालावधी बदलत गेला असला तरी त्याचा आत्मा नेहमीच व्यक्ती निर्माण असाच राहिल्याचं संघ अभ्यासकांना वाटत आहे. 


आता याच संघ शिक्षा वर्गाच्या प्रणालीत आणि अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय संघानं घेतला आहे. त्यावर गेले अनेक वर्षांपासून मंथन सुरू होतं. नुकताच गुजरातमधील भुज येथे झालेल्या संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बदलत्या काळानुरूप संघाच्या स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणात बदल केले जाणार आहेत. आता संघानं स्वयंसेवकांना व्यावहारिक ज्ञान (प्रॅक्टिकल नॉलेज) देण्याचं ठरविलं आहे. त्यासाठी स्वयंसेवकांना फक्त संघापुरतं सीमित न ठेवता इतर संघटनेनं केलेलं चांगलं कार्य दाखवण्याचं ठरवलं आहे. शिवाय स्वयंसेवकांना तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण मिळावं, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम संघ शिक्षा वर्गासाठी निश्चित केला जाणार आहे. तसेच, वेगवेगळ्या आयु वर्गातील स्वयंसेवकांना वेगवेगळं प्रशिक्षण देण्याचं ठरवलं गेलं आहे.  


संघ शिक्षा वर्गाच्या प्रणालीत आणि अभ्याक्रमात केले जाणारे बदल वर्ष 2024 पासून आमलांत आणलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यात संघाचे स्वयंसेवक नेहमीच्या शिस्त आणि ध्येयनिष्ठतेसह जास्त जागरूक आणि समाजोपयोगी ज्ञान संपन्न पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.