Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघात (Ramtek Lok Sabha Constituency) काँग्रेसने (Congress) रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांना उमेदवारी दिली असली तरी, काँग्रेस नेते किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) देखील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक आहेत. विशेष म्हणजे पक्षाकडून अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यावर देखील गजभिये उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम आहे. त्यामुळे रामटेकमध्ये काँग्रेस पक्षातून बंडखोरी होते की, काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.


रामटेकमध्ये माझ्या ऐवजी रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली गेल्याने माझ्यावर अन्याय झाला असल्याची भूमिका किशोर गजभिये यांनी बोलून दाखवली आहे. रामटेकमधून पात्र उमेदवाराला उमेदवारी दिली गेली नसल्यामुळे बौद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काँग्रेसला त्याचा फटका बसू शकतो, मी उद्या रामटेकमधून माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार असे किशोर गजभिये म्हणाले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील पहिली बंडखोरी ठरणार आहे. 


...तर किमान माझ्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार रामटेकच्या मैदानात राहील 


दरम्यान, उमेदवारी दाखल करण्याबाबत बोलतांना किशोर गजभिये म्हणाले की, "रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्राच्या वादामुळे रद्द होण्याची दाट शक्यता असून, पक्षाने पहिला ए.बी फॉर्म रश्मी बर्वे यांना द्यावा. मात्र, दुसरा ए.बी फॉर्म मला द्यावा. रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर किमान माझ्या रूपाने काँग्रेसचा उमेदवार रामटेकच्या मैदानात राहील" असा तर्क किशोर गजभिये यांनी मांडला आहे. त्यामुळे आता पक्षाकडून याबाबत काय भूमिका घेण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


छाननीत रश्मी बर्वे यांचा अर्ज टिकणार नाही


अनेक दशकं सनदी अधिकारी राहिल्यामुळे, जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यामुळे मला वाटतंय की, रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो. माझ्या अनुभवाच्या आधारे मी सांगत आहे की, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या छाननीत रश्मी बर्वे यांचा अर्ज टिकणार नाही, असेही गजभिये म्हणाले आहेत.  


अर्ज दाखल करण्यासंदर्भात खर्गेंची परवानगी घेतली....


साधारणपणे पक्ष दोन ए.बी फॉर्म पाठवते. पहिला नंबरचा फॉर्म पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवाराला दिला जातो. तर, दुसरा ए.बी फॉर्म पक्षाच्या स्थानिक मोठ्या नेत्यांकडे असतो आणि तो वेळेवर डमी उमेदवाराला दिला जातो. तोच दुसरा ए.बी फॉर्म मला द्यावं अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. मात्र, त्यांनी सध्या आदेश आले नाही, आदेश आल्यावर मी दुसरा ए.बी फॉर्म तुम्हाला देतो असा आश्वासन पटोले यांनी दिला असल्याचे गजभिये म्हणाले. तसेच, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची परवानगी घेतली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. 


माझ्यावर अन्याय झाला...


2019 मध्ये मी काँग्रेसची उमेदवारी मागितली नाही. तरी मला बळजबरीने एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल करायला लावले. दहा दिवसाच्या प्रचारात मी पौने पाच लाख मतं घेतली. यंदा पाच वर्ष रामटेकमध्ये तयारी केली जनसंपर्क ठेवला, त्यामुळे यंदा रामटेकमधून माझी दावेदारी क्रमांक एकची होती. तरी रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली. रश्मी बर्वे यांना उमेदवारी देताना ऑन मेरिट निर्णय झालं नाही. मला असं वाटते की रश्मी बर्वे यांना उमेदवारी देऊन माझ्यावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे त्यांचा फॉर्म अपात्र झाल्यास मला उमेदवारी देण्यात यावी अशी माझी मागणी आहे. मात्र, त्यामध्येही काही लोक अडथळे आणत आहे. पक्षाने पाठवलेले दोन्ही एबी फॉर्म रश्मी बर्वे यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी होत असून, हे चुकीचे असल्याचे गजभिये म्हणाले. 


बौद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे...


रश्मी बर्वे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आंबेडकरी समाजात बौद्ध समाजात प्रचंड नाराजी आहे. दीक्षाभूमी असलेल्या नागपुरात रामटेकमध्ये बौद्ध समाज बहुसंख्येने असूनही, बौद्ध समाजातील व्यक्तीला डावलून इतर पात्र नसलेल्या उमेदवारी दिल्यामुळे बौद्ध मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बौद्ध मतदारांच्या या नाराजीचा परिणाम फक्त रामटेकमध्येच नाही, तर विदर्भातील इतर मतदारसंघातही होईल. वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्ताव होता, मात्र मी तो नाकारला आहे. इतर पक्षांकडून अजून कुठला प्रस्ताव आलेला नाही, मी कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोडणार नाही. काँग्रेसमध्ये राहून संघर्ष करत राहणार असल्याचे देखील गजभिये म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Ramtek Lok Sabha : रामटेकची जागा शिवसेनेकडून काँग्रेसने खेचली, रश्मी बर्वे विदर्भात विजयी झेंडा फडकवणार?