नागपूर : केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याचं मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं. "राज्य सरकार नियमांनुसार सुरक्षा पुरवत असतं, राजकीय निर्णय नसतो," असंही ते म्हणाले. राज्यातील अनेक नेत्यांना मिळालेल्या केंद्राच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी बोट ठेवत हे मत मांडलं आहे. 


मनसे अध्यक्ष राज यांनाही केंद्राकडून सुरक्षा मिळणार असल्याची चर्चा आहे. तर त्याआधी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनाही केंद्राकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळाली आहे. या विषयी विचारलं असता दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "अलिकडे राज्याच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारुन काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. परंतु ठीक आहे केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात. आता त्या सुरक्षेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवायचं." 


मुख्य सचिव स्तरावरील समितीला सुरक्षा पुरवण्याचा अधिकार
राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करावी यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. परंतु सुरक्षेत वाढ न केल्याने केंद्राला पत्र लिहिल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "त्यांच्यासमोर सर्व चॉईस खुले आहेत. राज्यला पत्र लिहिलं असेल तर ते योग्य वेळी प्रोसेस होऊन त्याबाबत योग्य निर्णय होईल. एखाद्याला सुरक्षा देण्याबाबतची प्रक्रिया ठरलेली आहे. चर्चा होऊन निर्णय होतात, असे निर्णय होत नाहीत. कोणाला किती सुरक्षा द्यावी, याबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी असतात. कोणाला काही धोका असेल तर ते त्याबाबत निर्णय घेतात. हा संपूर्ण अधिकार समितीला आहे, कोणत्याही राजकीय व्यक्तीला नाही."


नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, केंद्रीय गृहामंत्रालयाने पुरवली 'वाय प्लस' सुरक्षा



नवनीत राणा यांना वाय दर्जाची सुरक्षा
अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. यानंतरच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. 


राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना केंद्रीय सुरक्षा 
नवनीत राणा यांच्या याआधी केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती. कंगनाने राज्य सरकारविरोधात भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत अनेक नेत्यांना तरुंगात टाकण्याचा इशारा देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना ही केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.