Praful Patel oN Anil Deshmukh : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवायचं आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केलं आहे. नागपुरातल्या लकडगंज परिसरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं. शरद पवारांच्या आशिर्वादानं अनिल देशमुख लवकरच जेलमधून बाहेर येतील, असा विश्वासही यावेळी प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी व्यक्त केला. हे आपलं मत नसून शरद पवार (Sharad Pawar) यांचं मत असल्याचं स्पष्टीकरणही प्रफुल पटेलांनी दिलं आहे. 


प्रफुल पटेल यावेळी बोलताना म्हणाले की, "हे अनिल भाऊ लवकरच आपल्या सोबत येतील. पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे. पवार साहेबांचा पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. आणि आपल्याला लवकरात लवकर अनिल बापूला परत या त्यांच्या जागेवर बसवायचं आहे. हे पवार साहेबांचे विचार आहेत. माझ्या एकट्याचे नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आपण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोणतीही पोकळी निर्माण झालीये, असं कोणाला वाटू नये. 


पाहा व्हिडीओ : अनिल देशमुखांबद्दल काय म्हणाले प्रफुल पटेल? 



अनिल देशमुखांवर आरोप...राजीनामा...आणि परमबीर सिंह (Parambir Singh) फरार; शरद पवारांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट काय?


अनिल देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "एक दिवस माझ्याकडे मुंबईचे पोलीस आयुक्त आले आणि त्यांनी मला सांगितले की, अनिल देशमुख यांच्याबद्दल माझी तक्रार आहे आणि ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरही घातली आहे. आता मी तुम्हाला सांगायला आलो आहे. त्यावर मी परमबीरांनी विचारलं की तुमची काय तक्रार आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितले आम्हाला देशमुखांनी अशा अशा सूचना दिले आहे."


शरद पवार पुढे म्हणाले की, "मी त्यांना म्हटले अनिल देशमुख यांनी अशा सूचना देणे शक्यच नाही. आणि तशा सूचना दिल्या असतील तर तुम्ही त्या सूचनांची अंमलबजावणी केली का? त्यावर परमबीरांनी सांगितले की त्याची आपण अंमलबजावणी केली नाही. जर पोलीस आयुक्तांनी त्या सूचनांची अंमलबजावणी केली नाही तर अनिल देशमुखांचा दोष काय हे मला समजत नाही. तुम्ही (परमबीर सिंह) इथे कोणाबद्दल अपप्रचार करत आहात असे मी त्यांना सांगितले".


परमबीर सिंह 'फरार' घोषित


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं आहे. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. आता यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केलं आहे.


परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. 


फरार घोषित करणं म्हणजे तो आरोपी स्वत:ला अटकेपासून लपवत असतो असा न्यायालयाचा समज होतो. आता परमबीर सिंहांना फराराची नोटिस दिली असल्याने त्यांची सर्व मालमत्ता सील केली जाणार आहे. या सील केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा अधिकार सरकारला आहे. न्यायालयाने परमबीर सिंहांना जरी फरार घोषित केलं असलं तरी त्यांना पुढील 30 दिवसात न्यायालयात हजर राहता येतं. आपण या आधी का उपस्थित राहू शकलो नाही याचं कारण द्यावं लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :