नागपूर : परमबीर सिंहांनी (Parambir Singh) केलेल्या एका तक्रारीमुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, पण त्यांच्यावर आरोप करणारे आता गायब आहेत. परमबीरांच्या मते त्यांना जर वसुलीची सूचना करण्यात आली होती, आणि त्यांनी ती अंमलात आणली नव्हती तर अनिल देशमुखांचा दोष काय हे समजत नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे. शरद पवारांनी आज अनिल देशमुख प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते आज नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.  


एकीकडे या प्रकरणामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यायला लागला तर दुसरीकडे आता  मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. सुरुवातील परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची सर्व माहिती दिल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती हे आज खुद्द शरद पवार यांनी सांगितलेल्या घटनाक्रमातून समोर आलंय.


काय सांगितलं शरद पवारांनी?
अनिल देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, "एक दिवस माझ्याकडे मुंबईचे पोलीस आयुक्त आले आणि त्यांनी मला सांगितले की, अनिल देशमुख यांच्याबद्दल माझी तक्रार आहे आणि ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरही घातली आहे. आता मी तुम्हाला सांगायला आलो आहे. त्यावर मी परमबीरांनी विचारलं की तुमची काय तक्रार आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितले आम्हाला देशमुखांनी अशा अशा सूचना दिले आहे."


शरद पवार पुढे म्हणाले की, "मी त्यांना म्हटले अनिल देशमुख यांनी अशा सूचना देणे शक्यच नाही. आणि तशा सूचना दिल्या असतील तर तुम्ही त्या सूचनांची अंमलबजावणी केली का? त्यावर परमबीरांनी सांगितले की त्याची आपण अंमलबजावणी केली नाही. जर पोलीस आयुक्तांनी त्या सूचनांची अंमलबजावणी केली नाही तर अनिल देशमुखांचा दोष काय हे मला समजत नाही. तुम्ही (परमबीर सिंह ) इथे कोणाबद्दल अपप्रचार करत आहात असे मी त्यांना सांगितले".


अनिल देशमुखांनी राजीनामा देण्याचा निश्चय केला
शरद पवार म्हणाले की, "जेव्हा अनिल देशमुखांना हे कळले त्याच दिवशी संध्याकाळी अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की आयुक्तांनी असे-असे आरोप केले आहे. जोवर याची शहानिशा होत नाही मी खुर्चीवर बसणार नाही, मी राजीनामा देतो मला इथे बसायचे नाही."


हे सर्व कशामुळे घडले तर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी केलेल्या तक्रारीमुळे घडले आणि तो आयुक्त आज कुठे आहे? केंद्र सरकार आणि राज्य सरकारने त्यांची चहूबाजूने चौकशी केली. आज त्या आयुक्तांला (परमबीर सिंह) फरार जाहीर केले आहे असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.


संबंधित बातम्या :