नागपूर : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नटसम्राटासोबत केली तर वावगं ठरणार नाही. त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर मोदींनी सिनेमात जावं. ते नटसम्राट आहेत," असा टोला काँग्रेसचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज (10 फेब्रुवारी) पहिल्यांदाच नागपूरला आले. यावेळी त्यांनी दीक्षाभूमी इथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेकडर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या कारकीर्दीचा उल्लेख करताना भावूक झाले होते. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले. यावरुन संजय राऊत, अजित पवार यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला असतानाच, नाना पटोले यांनीही नरेंद्र मोदींना यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, "मोदी यांची तुलना नटसम्राट यांच्यासोबत केली तर वावगं ठरणार नाही. त्यांना नटसम्राट बनायचं असेल तर त्यांनी सिनेमात जावं.
राज्यसभेत मोदींची नौटंकी आपण पाहिली. त्यांना टिकैत आणि शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत का? जे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते. मोदींना आजवर अनेकदा रडताना पाहिलं आहे. ते नटसम्राट आहेत."
नरेंद्र मोदी भावूक
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यावेळी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं.
अजित पवारांचा मोदींवर निशाणा
"पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल," अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोदींवर निशाणा साधला.
...तेव्हा मोदींचे अश्रू बाहेर पडले नाहीत : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, "पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदाच भावूक झाले नाहीत, यापूर्वी अनेकदा असे प्रकार घडले आहेत. पहिल्यांदा संसदेत प्रवेश करताना ते पायऱ्यांच्या पाया पडले होते. कालच्या प्रकारावर इतकेही भावनिक होण्याची गरज नव्हती. अशाप्रकारे अश्रूंचा बांध फुटणे हे काही नवीन नव्हते. देशाचे पंतप्रधान अशाप्रकारे संसदेत रडतात हा एक प्रकारचा विक्रम आहे. कारण आतापर्यंत 5 ते 7 वेळा ते भावनिक झाले आहेत. दिल्लीत मागील अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, अनेक शेतकरी यामध्ये मृत्युमुखी पडले, तेव्हा त्यांचे अश्रू बाहेर पडले नाहीत."
नाना पटोलेंच्या दौऱ्यात कोरोनाविषयक नियम पायदळी
दीक्षाभूमीच्या आधी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी दीक्षाभूमी, टेकडी गणपती, ताजबाग अशा विविध ठिकाणी भेट दिल्या. त्यांच्या आजच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केल्याने कोरोनाविषयक नियमांचाही फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.