नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. नाशिक येथे झालेल्या विकासकामांच्या आढावा बैठकीवेळी ते संवाद साधत होते.


गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने ज्या पद्धतीने ते आंदोलन हाताळलं आहे त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली.


नाशिकमध्ये विकास कामांच्या आढावा बैठकीवेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, "पंतप्रधान राज्यसभेत गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना भावूक झाले, असेच ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर भावूक झाले तर आनंद होईल." मंगळवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यावेळी गुलाम नबी आझादांच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.


अजित दादा नोकरासाठी इमोशनल, 'काहीही करा पण जालिंदरला वाचवा!', व्यस्त कार्यक्रमातून फोनाफानी


उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारुप आराखडा आढावा बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा आढावा घेतला. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्ह्यातील आमदार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जळगांव, धुळे, नंदुरबारची आढावा बैठक झाली. त्यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


मुंबई लोकल सेवासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "मुंबई लोकल वेळ बदलाचा निर्णय टप्या टप्याने होणार आहे. यावर राज्य सरकार केंद्र सरकारच्या सूचनेनुसार काम करत आहे."


राज्यातील विविध जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या निधीसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, "आपल्या जिल्ह्याला मोठा निधी मिळावा अशी प्रत्येक पालकमंत्र्याची भूमिका असते. मात्र यातून आपण मध्यम मार्ग काढतोय. निधी वाटप सूत्र ठरविले आहे. त्यानुसार निधी वाटप करण्यात येणार आहे. नाशिक साहित्य संमेलनला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्याच्या स्थापनेला 151 वर्ष पूर्ण झाली त्यासाठी अतिरिक्त 25 कोटी निधी देणार आहोत."


गडचिरोली, नंदुरबार ला चांगला निधी देणार असल्याचं सांगत अजित पवार म्हणाले की, "नंदुरबारला 130 कोटी रुपये, जळगावला 400 कोटी रुपये, धुळे जिल्ह्याला 210 कोटी रुपये, नाशिकला  470 कोटी रुपये तर अहमदनगर जिल्ह्याला 510 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत."


बंद दाराआड काय घडले? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही : अजित पवार