Vijay Wadettiwar Threat: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच जोर धरत असल्यानं राज्यात सध्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मोबाईलवर धमकी आल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी धमकी आल्याची बाब राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना कळवली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
जरांगे पाटलांवरील टिकेवरून तर धमकी नाही ना?
राज्यात ऐन हिवाळ्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापत असल्याचे चित्र आहे. त्याची धग आता थेट विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार यांना धमकी देण्यापर्यंत तर येऊन पोहचली नाहीये ना? असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. असा प्रश्न उपस्थित करण्यामागील कारण म्हणजे, विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच केलेलं जरांगे पाटलांवरील (Manoj Jarange) वक्तव्य. जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या भल्या पेक्ष्या स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्याची मंशा असावी. मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा पाटील यांना राजकीय लोकांच्या अधिक भल्यासाठी आग्रही आहेत, असा आरोप वडेट्टीवार यांनी जरांगे पाटील यांच्यावर केला होता. शिवाय जरांगे पाटील मराठा तरुणांची दिशाभूल करत असून मराठा तरुणांनी अभ्यास करून आपला मार्ग ठरवाव, असा सल्ला देखील दिला होता. त्यामुळे यांच प्रकरणातून विजय वडेट्टीवार यांना धमकी येत नाहीये ना असा सवाल उपस्थित झाला आहे.
गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षा वाढविण्याची केलीय मागणी
विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजासाठी एक अश्वस्त चेहरा आहे.ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या जरांगे पाटील यांच्या मागणीवर आपले कायम वेगळे मत मांडले आहे. शिवाय ओबीसीतून आरक्षणापेक्षा मराठ्यांना ईडब्लूएस मधून आरक्षण मिळाल्यास मराठा समाजाला अधिक फायदा होईल असा सल्ला देखील वडेट्टीवार यांनी दिला होता. सदर प्रकरणातून धमकी आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तावला जात आहे. यावर स्वतः विजय वडेट्टीवारयांनी मोबाईलवर धमक्या आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्याची मागणी देखीक वडेट्टीवार यांनी केली आहे.