विकासाची उड्डाणे भरणाऱ्या नागपूरच्या तथाकथित विकसित भागात ही घडली आहे. चिखल आणि खड्ड्यांनी व्यापलेल्या रस्त्यावरील एका खड्ड्यामध्ये एक सप्टेंबरच्या मध्यरात्री एक अॅम्बुलन्स अडकली. 40 वर्षीय भूषण टोळ यांना त्या अॅम्बुलन्समध्ये हार्ट अॅटॅक आल्यामुळे रुग्णालयात घेऊन जात होते. या अवस्थेत तिथेच खड्ड्यात फसलेल्या अॅम्बुलन्समध्ये अर्धा तास अडकून पडले. अॅम्बुलन्समध्ये भूषण यांना घेऊन रुग्णालयात जाणाऱ्या वैशाली अस्कर यांनी अवतीभवतीच्या लोकांचे दार ठोठाऊन झोपेतून उठवले.
लोकांनी मिळून अॅम्बुलन्स उचलून धरत ती बाहेर काढली आणि भूषण यांना रुग्णालयात रवाना करण्यात आले. मात्र, या सर्व कसरतीमध्ये अर्धा तास वाया गेला होता. परिणामी रुग्णालयात उपचार चालू असताना भूषण यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हा प्रशासनाने घेतलेला बळी असल्याचा आरोप वैशाली अस्कर यांनी केला आहे.
या संपूर्ण परिसरात साधी स्ट्रीट लाईटची ही सोय नसल्यामुळे रात्रीच्या वेळेला हे सर्व खड्डे आणखी जीवघेणे बनतात. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या हजारो नोकरदार महिलांनी संध्याकाळनंतर वाहने चालवणे आणि घराबाहेर निघणेच बंद केले आहे.
या समस्यांवर स्थानिक ग्राम पंचायत, स्थानिक नगरसेवक, स्थानिक आमदार आणि नागपूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रत्येक स्तरावर अनेक वेळा लेखी विनंती केल्या तसेच अर्जही दिले. मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. अनेक वेळेला प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवल्यानंतरही परिणाम शून्यच राहिल्याने आम्ही नागपुरात नव्हे तर मेळघाटात राहात असल्याची भावना नागरिकांनी बोलून दाखवली आहे.