Nitin Gadkari Threat Calls : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणात पीएफआय नंतर आता लष्कर ए तोयबाची एन्ट्री झाली आहे. कर्नाटकात लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारा बशिरूद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा यामगचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आलं आहे. कर्नाटकातील चिक्कबल्लापुरचा बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा याच्यावर अनेक आरोप आहेत. ढाका आणि बंगळुरू बॉम्ब हल्ल्यासह जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करण्याचा आरोप त्याच्यावर आहे.


नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात 4 जानेवारी आणि 21 मार्च  धमकीचे फोन आले. तेव्हा कोट्यवधी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. बेळगाव तुरुंगातून धमकीचे फोन आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.  त्यानंतर नागपूर पोलिसांनी 28 मार्च रोजी जयेश पुजारी उर्फ शाकीरला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते. नागपूर पोलिसांच्या चौकशीत जयेश पुजारीने सुरुवातीला दिशाभूल केली. मात्र त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीमध्ये धमकीच्या कॉल्सचे सूत्रधार वेगळेच असल्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी मग त्यांचा तपास त्या दिशेने सुरु झाला. 


गडकरींच्या कार्यालयात  21 मार्च रोजी दुसऱ्यांदा धमकीचा फोन आला. खंडणीसाठी कर्नाटक मधील एका तरुणीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. तेव्हा पोलिसांनी त्या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या रिजवाना नावाच्या तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहिच्या आधारावर बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हा यामगचा खरा सूत्रधार असल्याचं समोर आलं.  



कोण आहे अफसर पाशा?


बशिरुद्दीन नूर अहमद याचे गुन्हेगारी विश्वातील नाव हे अफसर पाशा असं आहे. तो कर्नाटकातील चिक्कबल्लापुराचा रहिवासी आहे. अफसर पाशा कर्नाटकात पीएफआयसह लष्कर ए तोयबाचा काम सांभाळात होता. त्याच्यावर 2003 चा ढाका बॉम्ब हल्ला, , 2005 चा बंगळूरु बॉम्ब हल्ला यांसह  जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काम करत असल्याचा आरोप आहे. पाशा हा 2006 पासून अटकेत असून 2014 पासून बेळगावच्या तुरुंगात आहे. तेव्हा तो बेळगावच्या तुरुंगातील जयेश पुजारी याच्या संपर्कात आला. तेव्हा पाशाने जयेशच्या मनात देशाविरोधात विष पेरल्याचं म्हटलं जात आहे.


तुरुंगातून चालणारं अफसर पाशा आणि जयेशचं नेटवर्क


पाशाने जयेशचा वापर फक्त नितीन गडकरी यांना धमकी देण्यासाठी केला नाही तर आपले दहशवादी नेटवर्क चालवण्यासाठी देखील त्याचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. तुरुंगात जयेश पुजारीकडे सतत मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा उपलब्ध होती. त्याला ही सेवा उपलब्ध करून देण्यामागे ही अफसर पाशा कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे.


अफसर पाशाच्या संघटनेने जयेशला तुरुंगात सर्व सेवा मिळाव्यात म्हणून एका वर्षात 18 लाख रुपये खर्च केल्याची माहिती मिळत आहे. फोन आणि इतर सेवेच्या मोबदल्यात पाशा जयेश कडून विविध ठिकाणी फोन करून घ्यायचा. तुरुंगातूनच जयेशने भारतातील विविध ठिकाणांसह पाकिस्तान, अमेरिका, सुडान, नायजेरिया आणि पोलंड या देशात फोन केल्याचे तपासात समोर आले आहे. पाशानेच हे फोन कॉल करून घेतले असल्याची अशी शंका पोलिसांना आहे.


त्यामुळे जयेश पुजरीच्या मार्फत गडकरींच्या कर्यकायात धमकीच्या फोनमागे लष्कर ए तोयबाच्या या कुख्यात दहशतवाद्याचा काय हेतू होता याची चौकशी सध्या पोलिसांकडून करण्यात येणार आहे. तसेच अफसर पाशाला नागपुरात आणल्यानंतर पोलीस पाशा आणि जयेशला समोरासमोर बसून चौकशी करणार आहेत. तेव्हाच या धमकी प्रकरणातील सत्य बाहेर येण्यास मदत होईल. 


हे ही वाचा : 


Aurangabad ACB Action : आठ दिवसांपूर्वी विशेष पथकात बढती, एक लाख रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला अटक