Nagpur News : नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी मानले आहे. या तिन्ही दोषींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू अशी दोषींची नावं आहेत. नागपूरचे (Nagpur) पत्रकार रविकांत कांबळे यांची आई आणि दीड वर्षांच्या मुलीची 17 फेब्रुवारी 2018 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. आज नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयात त्या प्रकरणात न्यायाधीशांनी आपला निर्णय सुनावत तिन्ही आरोपींना दोषी ठरवलं आहे. त्यानंतर आजच त्यांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


 


नागपुरातल्या न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या 55 वर्षीय आई उषा आणि दीड वर्षांची मुलगी राशी यांची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी किराणा दुकानदार गणेश शाहू याची पत्नी आणि भावांनाही अटक केली होती. गणेशची पत्नी गुडिया शाहू आणि भाऊ अंकित आणि सिद्धू यांचाही आजी-नातीच्या हत्येत सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. यातील तीन आरोपींना पोलिसांनी दोषी ठरवलं आहे. 


काय आहे प्रकरण?


17 फेब्रुवारी 2018 रोजी  संध्याकाळपासून आजी-नात बेपत्ता होत्या, त्यानंतर रविवारी (18 फेब्रुवारी 2018) त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका गोणीत गुंडाळलेले सापडले होते. बेपत्ता होण्यापूर्वी उषा कांबळे या राशीला घेऊन घराजवळच्या ज्वेलर्सकडे पायपट्टी घेण्यासाठी गेल्या होत्या. परत येताना शिव किराणा स्टोअर्सजवळ त्या काही वेळ थांबल्या होत्या. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरीच न परतल्यामुळे कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.


त्यानंतर 18 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी दोघींचे मृतदेह घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर एका नाल्यात आढळले होते. या घटनेचे धागेदोरे पोलिसांना कांबळे कुटुंब राहत असलेल्या पवनपुत्रनगर परिसरात मिळाले. पोलिसांना कांबळे कुटुंबियांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर शिव किराणा स्टोअर्स अँन्ड डेली नीड्सच्या समोर उभ्या असलेली महिंद्रा xuv गाडी संशयास्पदरित्या धुतलेली आढळली. पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये पोलिसांना काही रक्ताचे डाग मिळाले. पोलिसांनी किराणा दुकानचा मालक गणेश शाहूला ताब्यात घेत विचारपूस करायला सुरुवात केली. 


गणेशच्या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. इतकंच नाही, तर किचनमधील बेसिन आणि बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळले. छतावरच्या पंख्याच्या एका पात्यावरही रक्ताचे डाग आढळले. तसेच परिसरातील काही लोकांनी शनिवारी संध्याकाळी उषा कांबळे यांना शिव किराणा स्टोअर्सजवळ पाहिलं होतं. अखेर पोलिसी खाक्या दाखवला आणि गणेश साहूने हत्येची कबुली दिली. आर्थिक वादातून आपण या दोघींची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. 


हेही वाचा


नागपुरात आर्थिक वादातून पत्रकाराची आई आणि मुलीची हत्या