नागपूर :  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)  हे कट्टरपंथी संघटनांच्या रडार वर आहेत का, असा प्रश्न आता व्यक्त करण्यात येत आहे. कारण धमकी प्रकरणातील आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीरच्या मागे अदृश्य शक्तींचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. जयेश पुजारीच्या नागपूर पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.  हे प्रकरण दिसते, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गंभीर असल्याचे समोर येत आहे.. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचे तपास लवकरच केंद्रीय तपास यंत्रणांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


नागपूरच्या नितीन गडकरी यांच्या याच जनसंपर्क कार्यालयात 14 जानेवारीला लागोपाठ तीन धमकीचे फोन आले. फोन करणाऱ्याने नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना 100 कोटींची खंडणी मागत नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी ही दिली होती. तेव्हा पोलिसांच्या तपासात धमकीचे फोन जयेश पुजारी उर्फ कांथा नावाच्या कुख्यात गँगस्टरने बेळगावच्या तुरुंगातून केल्याचे स्पष्ट झाले होते.  त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याच्या आधीच 21 मार्च रोजी पुन्हा तीन वेळा पुन्हा धमकीचे कॉल आले.  पुन्हा त्याच जयेश पुजारीने गडकरी यांच्या कार्यालयात 10 कोटींची खंडणी मागत शिवीगाळ केली 


थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात  एकदा नव्हे तर दोन वेळा धमकीचे कॉल करणाऱ्या जयेश पुजारीला 28 मार्च रोजी नागपुरात आणण्यात आले. सुरुवातीला जयेशने फक्त प्रसिद्धीसाठी धमकीचे कॉल केल्याचा कांगावा केला. मात्र, त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः त्याचे इंट्रोगेशन केले आणि जयेशचे संपर्क काही धोकादायक संघटनांशी आहे का असा संशय निर्माण झाला आहे. 


पोलिस दलातील खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 



  • जयेश पुजारीने काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले आहे. 

  • त्यानंतर त्याचा नाव शाकीर ठेवण्यात आला आहे..

  • पोलीस चौकशीत जयेश नाव उच्चारताच तो माझे नाव शाकीर असल्याचे सांगून आक्षेप घेतो.

  • जयेशला तुरुंगात स्मार्ट फोनच्या माध्यमातून आपल्या पत्नी व इतर महिला मित्रांशी सतत व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात  होता.

  • तुरुंगात त्याला मागेल तेव्हा मांसाहार आणि इतर सोयी उपलब्ध होत्या  


 तुरुंगात त्याला सर्व सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी कोणीतरी धनबलाचा प्रचंड वापर करत असल्याची शंका निर्माण झाली आहे.. मात्र, त्या अदृश्य शक्तींचा जयेश उर्फ शाकीरच्या माध्यमातून गडकरी यांना धमकी देण्यामागे काय हेतू आहे हे अजून ही गुलदस्त्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच नागपूर पोलीस जयेशला परत बेळगावच्या तुरुंगात पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते.  शिवाय जयेश उर्फ शाकिरचा काही कट्टर संघटनांशी संपर्क असल्याच्या संशयावरून धमकी प्रकरणाचा पुढचा तपास केंद्रीय तपास यंत्रणाकडे जाण्याची ही दाट शक्यता आहे.


संबंधित बातम्या :


नितीन गडकरी धमकी प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याची शक्यता; चौकशीत आरोपीकडून धक्कादायक खुलासे, सूत्रांची माहिती