नागपूर : नागपुरात गेल्या दहा दिवसांत 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या नागपुरात पोलिसांचे काय सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लकडगंज झोनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या दारू व मटन पार्टी प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 


पोलिसांच्या या ओल्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह एकूण तीन जणांना निलंबित करण्यात आलं आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश लाडे, हेडकॉन्टेबल रत्नाकर मेश्राम आणि प्रदीप राव या तिघांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणामुळे नागपूर पोलिसांची प्रतीमा अजून मलिन झाली. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 10 दिवसात  नागपूर पोलिसांच्या 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं विविध प्रकरणात निलंबन करण्यात आलं आहे.


ठाण्यातील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची आत्महत्या, नागपूरच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा


गोरेवाडा भागात जखमी अवस्थेत सापडलेल्या वृद्ध भैय्यालाल बैस यांना वेळीच मदत न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेत मानकापूर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस उपनिरीक्षकासह एकूण चार जण निलंबित झाले होते. तर ठाण्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानंतर खंडणी वसूल केल्याचा आरोप लागलेले एक पोलीस निरीक्षक आणि एक पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले होते. आता कार्यालयात ओली पार्टी केल्या प्रकरणी तीन पोलीस कर्मचारी निलंबित झाले आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांच्या शहरात पोलिसांचे नेमके काय सुरू आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


नागपुरात पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा कहर, जखमी वृद्धाला वेळेत रुग्णालयात न नेल्याने मृत्यू, चौघांचं निलंबन