Devendra Fadnavis Meets Ashish Deshmukh : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या घरी गेले आहेत. देवेंद्र फडणवीस आज नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील आहेत. दरम्यान आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून (Congress) निलंबित करण्यात आलं आहे. आता देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.


आशिष देशमुखांना भाजपकडून सावनेरमधून उमेदवारी मिळणार?


आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कारण आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. तसंच, सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. त्यामुळे यंदा देशमुखांना संधी मिळणार का, हे पाहावं लागेल


देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य 


दरम्यान सावनेरमध्ये कार्यकर्त्यांसमोर शुक्रवारी (19 मे) बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं. उमेदवार ठरल्यावर वाद नको, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांच्या भेट घेतल्यानंतर काय निर्णय होणार? देशमुखांना सावनेरमधून भाजपकडून उमेदवारी मिळणार का हे पाहावं लागेल.


सावनेरच्या जागेवर आशिष देशमुखांचा डोळा?


बंडखोर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावर डोळा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आशिष देशमुख यांनी त्यांचे वडील रणजीत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त, 29 मे रोजी सावनेर मध्ये अभिष्टचिंतन सोहळा आयोजित केला आहे. सावनेर हा रणजीत देशमुख यांचा जुना मतदारसंघ असून सुनील केदार यांच्यापूर्वी रणजीत देशमुख हेच सावनेरचे आमदार होते. 1996 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून सुनील केदार यांनीच रणजित देशमुख यांचा पराभव केला होता. यामुळे सावनेरमधील देशमुख कुटुंबीयांची सत्ता खालसा झाली होती. 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख हे सुनील केदार यांच्याविरोधात उभे राहणार का, ते पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वी देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे सावनेरचं राजकारण आगामी काळात कुठलं वळण घेतं ते पाहायचं.