Nana Patole : महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2023) दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले. अशातच नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने विविध विषयांच्या मागण्या घेऊन  मोठा मोर्चा विधान भवनावर  काढण्यात आला होता. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करत शेकडो कार्यकर्ते विधान भवनाकडे जात होते. बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सर्व आंदोलक आक्रमक झाले. या तरुणांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, युवक काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवारसह शेकडो कार्यकर्ते शामील झाले होते.  यावेळी नाना पटोलेसह उपस्थित आंदोलकांना पोलिसांनी बळजबरीने  ताब्यात घेतले. यावेळी नाना पटोलेंना (Nana Patole)  पोलिसांनी अक्षरशः उचलून नेत आपल्या ताब्यात घेतले.   


पोलिसांनी अक्षरशः उचलून नेले


बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांना हमीभाव, सर्वसामान्याना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नाच्या मुद्द्यावरुन युवक काँग्रेसच्या वतीने विधान भवनाच्या दिशेला मोर्चा काढण्यात आला होता. ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलनात सहभागी तरुणांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसही सतर्क होऊन त्यावर लक्ष ठेऊन होते. परिणामी हा मोर्चा अधिक तीव्र होत असल्याने  आणि  सर्व आंदोलक तरुण आक्रमक होत असल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली.ज्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोलिसांनी बळजबरीने उचलून नेल्याचे बघायला मिळाले. 


सरकारला तरुणांच्या प्रश्नावर उत्तर द्यावेच लागेल- नाना पटोले 


सध्या राज्याच्या विधी मंडळाचं हिवाळी आधिवेशन नागपुरात सुरू असून आज या अधिवेशनाचा दूसरा दिवस आहे. आज शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांनावर चर्चा करत नाही म्हणून आज विरोधकांनी सभागृहच्या बाहेर येत जोरदार घोषणाबाजी केली.आज यांच मुद्दयासह इतर विषय घेऊन युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले की,   हे सरकार तरुणांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत आहे. तरुणाईच्या हाताला काम नाही, तरुण बरबाद करण्याचं काम हे सरकार करत आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं त्यावेळेसही महाभरतीच्या नावाने ऑनलाईन पद्धतीच्या नावावर  तरुणांना लुटल्या गेले. हक्काच्या नोकऱ्या दिल्या नाहीत. महाराष्ट्रात आज लाखो पदं खाली आहेत. कंत्राटी भरतीच्या नावाने हे तरुणांचे आयुष्य बरबाद करत आहेत. सरकारला प्रश्न विचारण्यासाठी हे आंदोलन आहे. याचं उत्तर सरकारला  द्यावं लागेल, असं नाना पटोले म्हणाले.