नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या आई मीराबाई फाल्गुनराव पटोले (Meerabai Patole passes Away) यांचं वयाच्या 92 व्या वर्षी आज पहाटे नागपूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्यावर भंडाऱ्याच्या सुकळी या स्वगावी चुलबंद नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या आईचं अंतिम दर्शन घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले.  


नाना पटोले यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांच्या आईला अखेरचा निरोप दिला. यावेळी नाना पटोले यांचे मोठे बंधू विनोद पटोले आणि पटोले कुटुंबांसह उपस्थितांचेही डोळे पानावल्याचं चित्र बघायला मिळाला. अंत्यविधीसाठी नाना पटोले यांचे राजकीय हाडवैर असलेले भाजप नेते आमदार परिणय फुके, नाना पटोले यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढणारे भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ता आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 






विजय वडेट्टीवार यांनी वाहिली श्रद्धांजली


दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मीराबाई पटोले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी 'एक्स'वर पोस्ट शेअर करून म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार नाना पटोले यांच्या आई मीराबाई पटोले यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी मी आणि माझे संपूर्ण कुटुंब पटोले कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वरचरणी प्रार्थना आहे की नाना पटोले आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे.






पटोले कुटुंबियांच्या दु:खात सहभागी : बाळासाहेब थोरात


तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मीराबाई पटोले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलंय की, काँग्रेस पक्षातील आमचे सहकारी, प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही सर्व पटोले कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.



आणखी वाचा 


मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चुकीची माहिती दिली, त्यांच्याविरोधात हक्कभंग आणणार, बीड आणि परभणी प्रकरणावरुन नाना पटोलेंचा हल्लाबोल