नागपुरातील वाडी भागातील सुरक्षा नगर परिसरात राहणाऱ्या 73 वर्षीय शंकर चंपाती आणि 65 वर्षीय सीमा चंपाती या दाम्पत्याची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली होती. राहत्या घरी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले होते.
दुहेरी हत्येप्रकरणी चंपाती यांची 25 वर्षीय मुलगी प्रियांका आणि तिचा 26 वर्षीय प्रियकर इकलाख खान या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर त्यांचा आणखी एक मित्र फरार आहे. शंकर आणि सीमा चंपाती यांच्या संपत्तीसाठी तिघांनी ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
VIDEO | संपत्तीसाठी मुलीकडूनच जन्मदात्या आई-वडिलांची हत्या | नागपूर | एबीपी माझा
हत्येपूर्वी रविवारी प्रियांकाने आई-वडिलांना नाश्त्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या होत्या. दोघं निद्रावस्थेत असताना प्रियांकाने प्रियकर इकलाख खान आणि त्याच्या एका मित्राला घरी बोलावलं. त्यानंतर चाकूने गळा चिरुन आणि डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करुन त्यांची हत्या केली. हत्येनंतर तिघेही घर उघडं ठेवून पळून गेले.
नागपुरात वृद्ध दाम्पत्याची हत्या, चोरीच्या उद्देशाने हत्येचा संशय
रात्री आठ वाजता घरी आल्यावर आई-वडिलांची हत्या झाल्याचं उघड झाल्याचा कांगावा प्रियांकाने केला. घरातून काही रक्कम चोरीला गेल्याचंही तिने सांगितलं होतं.
सरकारी विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शंकर चंपाती यांचा दत्तवाडी चौकात नारळपाण्याचा व्यवसाय होता. तर सीमा या गृहिणी होत्या. विशेष म्हणजे आई वडिलांना मारणारी उच्चशिक्षित प्रियांका खाजगी क्षेत्रात नोकरी करत आहे.
सुरुवातीला, चोरीच्या उद्देशाने किंवा पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. काही दिवसांपूर्वी शंकर चंपाती यांना एका तरुणाने रस्त्यावर धडक दिली होती. त्याच्या विरोधात शंकर चंपाती यांनी वाडी पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची तक्रार दिली होती. त्या तरुणाने अपघाताच्या तक्रारीबद्दल शंकर चंपाती यांना दमदाटी केली होती. त्यामुळे याचा संदर्भही पोलिस लावत होते, मात्र संपत्तीच्या वादातून लेकीनेच आई-वडिलांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात उघड झाला.