Nagpur ZP By Election : नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या 16 जागांचे निकाल हाती आले आहेत. हाती आलेल्या निकालांनुसार, भाजप 3, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 9, शेकाप 1, गोंडवाना गणतंत्र पार्टीचा एका जागेवर विजय झाला आहे. तर शिवसेना आणि इतर एकही जागा मिळालेली नाही. नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघासाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघासाठी काल (मंगळवारी) पोटनिवडणूक झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागांत विखुरलेल्या 1 हजार 115 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून मतदारांनी आपला कौल दिला. 


नागपुरात काँग्रेसच्या मागच्या तुलनेत दोन जागा वाढल्या आहेत. काँग्रेस 7 वरून 9 वर गेली आहे. भाजपनं एक जागा गमावली असून भाजप 4 वरून 3 वर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन जागा गमावल्या असून राष्ट्रवादी 4  वरून 2 वर आली आहे, तर शेकापनं आपली 1 जागा कायम राखली आहे. गोंडवाना गणतंत्र पार्टीनं 1 जागा जिंकत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. तर शिवसेना 11 मतदारसंघात निवडणूक लढवूनही एकही जागा जिंकू शकली नाही.  


Zilla Parishad Election Results 2021 LIVE : झेडपी, पंचायत समिती पोट निवडणुकीचा आज निकाल, वाचा प्रत्येक अपडेट


नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूकीच्या 16 जागांचे निकाल हाती आले असून या निकालांनुसार, नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेस पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. काँग्रेसच्या एकूण 31 जागा होत्या, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं त्यातल्या 7 जागा रद्द केल्या होत्या. परंतु, निवडणुकीत 9 जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकूण 33 जागांवर विजय मिळाला आहे. 


नागपूर जिल्हा परिषद निवडणूक, आतापर्यंत  जिल्हा परिषदेच्या 16 जागांचे निकाल हाती 



  • भाजप : 03

  • शिवसेना : 00

  • राष्ट्रवादी : 02 

  • काँग्रेस : 09 

  • शेकाप : 01

  • गोंडवाना गणतंत्र पार्टी : 01

  • इतर : 00


नागपूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या अनेक सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर या पोटनिवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा जिंकून आपले बहुमत पुन्हा साध्य करण्याचे आव्हान काँग्रेससमोर होतं. तर सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपसमोर या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आपली सदस्य संख्या वाढवण्याचं आव्हान आहे. 


नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी केली असली, तरी शिवसेनेने वेगळी चूल मांडत अकरा ठिकाणी उमेदवार उभे केल्याने बहुतांशी मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. काही ठिकाणी दमदार बंडखोरांनी निवडणूक बहुरंगीही बनवली होती.