Coronavirus : कोरोना संकटात आशेचा आणखी एक किरण आता दिसू लागला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी ग्लेन्मार्क कंपनी औषध तयार करत आहे. नाकाद्वारे घेण्याच्या नेजल स्प्रेची चाचणी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार आहे. कोरोनाची सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांवर याची चाचणी करण्यात येणार आहे. 


कोरोना प्रतिबंधक लस आली असून लसीकरण सध्या सुरु आहे. अशातच आता कोरोनावर प्रभावी औषध तयार करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशातच ग्लेन्मार्क कंपनी सध्या कोरोनावर प्रभावी नाकाद्वारे घेण्याचा नेजल स्प्रे तयार करत आहे. 


कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांवर उपचारासाठी आता नेजल स्प्रे म्हणजेच, नाकावाटे दिल्या जाणारी उपचार पद्धती ही उपलब्ध होत आहे. ग्लेन्मार्क कंपनीने विकसित केलेला स्प्रे सध्या चाचणीच्या पातळीवर असून नागपूरात कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर या नेजल स्प्रेची चाचणी केली जाणार आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसिन विभागामार्फत महाविद्यालयातील रुग्णालयात या स्प्रेची क्लिनिकल ट्रायल होणार आहे. 


पाहा व्हिडीओ : Coronaरुग्णांवर उपचारासाठी नेजल स्प्रेची चाचणी नागपुरात सुरु, वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या नजरा



कोरोनाचे संसर्ग नाकावाटे होत असल्यानं त्याचा उपचारही नाकावाटे दिल्या जाणाऱ्या स्प्रेद्वारे शक्य आहे, असा कंपनीचा तर्क आहे. या स्प्रेच्या माध्यमातून विशिष्ट मात्रेत नायट्रिक ऑक्साइड दिलं जात असल्यानं नायट्रिक ऑक्साइड नेजल स्प्रे टेस्ट असं या क्लिनिकल चाचणीचं नाव आहे. या चाचणीत सौम्य लक्षणं असणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना 5 दिवस दररोज 6 डोज (6 वेळा स्प्रे) दिले जाणार आहेत. या चाचणीच्या निष्कर्षानंतर कोरोनावर उपचाराच्या दृष्टीनं हे औषध उपयोगी आहे की, नाही हे ठरणार आहे. 


दरम्यान, नाकावाटे दिला जाणारा स्प्रे कोरोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावू शकेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. मात्र, सर्व काही या स्प्रेच्या चाचणीच्या निष्कर्षांवर अवलंबित असल्याचं तज्ज्ञांना वाटतंय. या चाचणीत सहभागी होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर तो बरा झाल्यानंतरही अनेक दिवसांपर्यंत त्याच्या प्रकृती संदर्भात आणि संभाव्य परिणामा संदर्भात तज्ञ आणि डॉक्टर लक्ष ठेवून राहणार आहे.