ZP Pension Scam Nagpur : नागपूर जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पेन्शन घोटाळ्यात गटविकास अधिकारी (BDO) आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांसह (BEO) दहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 


या घोटाळ्याची मुख्य सूत्रधार महिला लिपीक सरिता नेवारे हिच्याकडे पारशिवनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात पेन्शन चा टेबल होता. मृत व्यक्तींची पेन्शन नियमानुसार बंद करणे आवश्यक होते. परंतु नेवारे यांनी 17 बनावट नावांवर महिन्याकाठी 5 लाख याप्रमाणे सुमारे 1 कोटी 86 लाख 57 हजार 127 रुपये स्वत:सह परिचितांच्या नावावर वळते केले. ऑक्टोबरमध्ये तिला जिल्हा परिषद प्रशासनाने निलंबित केले. गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारही स्थानिक पातळीवर पारशिवनी पोलिसांकडे दाखल केली.


या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती गठित केली. समितीने चौकशी करुन अंतिम अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला सादर केला. गुन्हे शाखा पोलिसांनीही तपास करुन मुख्य सूत्रधार नेवारेसह सहा आरोपींना अटक केली आहे. हा संपूर्ण घोटाळा सुमारे 2013 पासून होत असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. त्यामुळे या कालावधीत पारशिवनी पंचायत समितीला असलेल्या तत्त्कालीन चार बीडीओ यांच्यासह तत्त्कालीन तीन-चार गटशिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचारी अशा सुमारे दहा जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यातील काही अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत. याप्रकरणी एकालाही नोटीस न बजावल्याने सीईओंच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्यानंतर अखेर प्रशासनाने संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


मृत पावलेले कर्मचारी रेकॉर्डवर 'हयात'


नागपूर जिल्हा परिषदेत एका कनिष्ठ महिला लिपिकाने मृतांच्या नावाची पेन्शन जवळच्या मंडळींच्या बँक खात्यात वळती करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे जिल्हा परिषदेचे (Nagpur ZP CEO) मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकरांकडून गैरव्यवहारांना आळा घालण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे घोटाळे समोर येत आहेत. जिल्हा परिषदेच्या इतिहासामधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा (Biggest Scam In Nagpur ZP) असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करुन चौकशी समिती गठित करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात येते. नेवारे असे महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शन ची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी 'हयात' (जिवंत) असल्याचे दाखवत त्यांची पेन्शन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात वळती करत होत्या.


ही बातमी देखील वाचा...


एकीकडे वाढती गुन्हेगारी तरी नागपूर पोलीस आयुक्तालय सलग दुसऱ्या वर्षी राज्यात 'बेस्ट'