Nagpur crime News : शिवीगाळ करुन रेस्टॉरेंट मालकाकडे खंडणी मागण्याची घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आली असून दोन आरोपींना पोलिसांना अटक केली. एक आरोपी फरार असून त्याच्या शोधात पोलीस आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव रामचंद्र मानेकर (वय 33, रा. नाईकनगर, मानेवाडा रोड) यांचे मानेवाडा रोडवरील बालाजीनगरात कान्हा स्विट्स नावाचे रेस्टॉरेंट आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 5.30 वाजताच्या सुमारास ते दुकानात बसले होते. आरोपी शुभम हंसराज फुलझेले (वय 25, रा. बालाजीनगर), शिवम सुभाष चौधरी (वय 27, रा. कैलासनगर) हे दुकान आले. आरोपी शिवम चौधरी याने त्यांना 'हमको हर हफ्ते दो हजार रुपये चाहिये, मना मत करना, नही तो तेरा खानदान सफा कर देंगे', अशी धमकी दिली. यावर फिर्यादीने त्यांना 'मी लहान व्यवसायिक आहे. पैसे देऊ शकत नाही, वाटल्यास तुम्ही नाश्ता करून घ्या' असे म्हटले. तेव्हा आरोपी शुभम फुलझेले याने 'तू कहा रहता मालुम है, तेरा आना-जाना सब पता है, पैसा तो देना पडेगा. सब लागू है', असे म्हणून खंडणी मागितली.


त्यानंतर पुन्हा मंगळवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आरोपी रोशन हजारे (वय 28, रा. महालक्ष्मीनगर) याने दुकानातील मुलीला अश्लील शिवीगाळ करत नाश्ता मागितला. पैसे मागितले असता त्याने पुन्हा शिविगाळ केली आणि शस्त्र असल्याचे भासवून धमकी दिली. फिर्यादीने लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसांना (Nagpur Police) पाहून आरोपी पसार झाला.


कुख्यात गुंड आरिफ स्थानबद्ध


पाचपावली हद्दीतील चर्चित गुंड सय्यद आरिफ ऊर्फ सोनू सय्यद शराफत (वय 23) रा. पिवळी मारबत चौक, बंगाली पंजा याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए लावला आहे. आरिफवर पाचपावली, यशोधरानगर, शांतिनगर, लकडगंज, वाठोडा आणि खापरखेडा ठाण्यांतर्गत खुनाचा प्रयत्न, लुटमार, मारहाण, शस्त्राने लोकांना नुकसान पोहोचवणे, दरोडा आणि जिवे मारण्याची धमकी देण्यासह अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. 2018 मध्ये पोलिसांनी त्याला तडीपारही केले होते. मात्र आरिफवर त्याचा कोणताही प्रभाव पडला नाही. तो सतत गुन्हेगारीत सक्रिय आहे. 2021 मध्येही त्याच्यावर एमपीडीए लावण्यात आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर लुटमार आणि मारहाण केल्याचे गुन्हे दाखल झाले.


जरीपटक्यात घरफोडी


जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात आरोपीने घरफोडी करुन चांदीच्या मूर्तीसह 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी पोलिसांनी सोनाली रत्नाकर साखरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविला. 22 डिसेंबरला सोनाली बाहेरगावी गेल्या होत्या. यादरम्यान आरोपीने कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश करीत चांदीच्या मूर्ती, किचन सेट असा माल चोरुन नेला.


ही बातमी देखील वाचा...


एकीकडे वाढती गुन्हेगारी तरी नागपूर पोलीस आयुक्तालय सलग दुसऱ्या वर्षी राज्यात 'बेस्ट'