नागपूर : अवैध दारु विक्रेत्यांनी गावातील दोन तरुणांना मारहाण केल्यानंतर गावातील महिलांनी दारु विक्रेत्यांची वाहने जाळून, त्यांच्या अड्ड्यातून अवैध दारु साठा जप्त केल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येरला गावात रविवारी (17 जानेवारी) मध्यरात्री ही घटना घडली.
येरला गावातील महिलांनी अवैध दारु विक्री बंद करण्याची मागणी लावून धरली होती. अनेक महिन्यांपासून या महिला ही मागणी करत होत्या. परंतु दारु विक्रीचा धंदा सुरुच होता. त्यामुळे महिलांनी त्यांच्या अवैध दारु विक्रेत्यांच्या धंद्याच्या परिसरात गस्त सुरु केली होती. परिणामी दारु विक्रेते काही गावकऱ्यांवर चिडून होते.
त्यातच किरकोळ कारणावरुन रविवारी रात्री दारु विक्रेत्यांनी गावातील दोन तरुणांना मारहाण केली. हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन गावातील रस्त्यावर धुमाकूळ केला. त्यानंतर चिडलेल्या महिलांनी एकत्रित येत अवैध दारु अड्ड्यावर धावा बोलत विक्रेत्यांना मारहाण केली. यामुळे दारु विक्रेते पळून गेले. परंतु महिलांनी त्यानंतर त्यांच्या सहा दुचाकी जाळल्या.
घटनेनंतर सोमवारी (18 जानेवारी) दिवसभर गावात तणावाचे वतावरण होते. दोन तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी गोलू वर्मा, आनंद वर्मा, अमिनेश वर्मा आणि त्यांचे तीन ते चार साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.