Nagpur Weather News : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारठा वाढेल, असा हवामान विभागाने आधीच दिला आहे. डिसेंबरच्या शेवटी पारा 13 अंशांपर्यंत पोहोचल्याने तसे संकेतही मिळाले होते. मात्र नववर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशी किमान तापमानाने पुन्हा उसळी घेतली. रविवारी 15.6 अंश तापमानाची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा 2.8 अंशाने अधिक आहे. दिवसाचा पारा मात्र सरासरीपेक्षा 2.1 अंशाने घटला असून 28.6 अंशाची नोंद करण्यात आली. 


जानेवारी महिना अत्याधिक थंडीचा असतो. या महिन्यात किमान व कमाल दोन्ही तापमानात घट होते. दिवसा सरासरी 21 ते 30 अंश तापमान असते  आणि रात्री सरासरी 12.5 अंश तापमान असते. गेल्या दशकभरात अनेकदा जानेवारीमध्ये पारा 10 अंशाच्या खाली घसरला आहे. अवकाळी पावसाची शक्यताही या महिन्यात अधिक असते. यावर्षी थंडी पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यंदा हिवाळ्यात म्हणावी तशी थंडी पडली नाही. 


दरम्यान, नागपूरकरांना (Nagpur) अद्याप कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात गारवा जाणवतो पण नेहमीची थंडी नाही. पहाटे 4 ते 7 वाजताच्यादरम्यान काहीसा गारठा वाढलेला असतो पण सूर्य निघाल्यानंतर तोही निघून जातो. पुढचे काही दिवस किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.


राज्यातील अनेक शहरांचे तापमान 11 ते 12 अंश सेल्सिअस


नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात भारतात (India) थंडीची लाट पसरली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) थंडी पडू लागली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे वर्षाचा पहिला दिवस थंड होता. मुंबईतही (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी जाणवत आहे. सोमवारी मुंबईत 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी मुंबईत 15.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. माथेरानमध्येही 15 अंश तापमानाची नोंद झाली आहे. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये 11 ते 12 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


या राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता


नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उत्तर पश्चिम भारताच्या मोठ्या भागात थंडीची लाट पसरली आहे. येत्या तीन दिवसांत उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील दोन दिवस उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या विविध भागांत थंडीची लाट पसरण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.


ही बातमी देखील वाचा...


उद्यापासून नागपुरात इंडियन सायन्स काँग्रेस, पंतप्रधानांची व्हर्च्युअल उपस्थिती; राज्यपाल, मुख्यमंत्री प्रत्यक्ष सहभागी