नागपूर: औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाचे नागपूरमध्ये हिंसक पडसाद उमटले होते. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली. 'एबीपी माझा'ने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भयावह अनुभव सांगितला. चिटणीस पार्कमधील पेशने कुटुंबीयांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांची गाडी जाळण्यात आली. पेशने कुटुंबातील गृहिणीने सांगितले की, काल संध्याकाळी  सात-आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी अचानक जमावाने लोखंडी रॉड आणि दगडांच्या सहाय्याने आमच्या भागात हल्ला चढवला. (Nagpur Violence)


त्यावेळी जमावातील माणसं अचानक मोठमोठे दगड फेकायला लागली. आम्ही सगळे घरात होतो. माझे पती आणि मुलगा बाहेर होता. गर्दी वाढल्यानंतर मी त्यांना घरी बोलावून घेतले. ते घरी येईपर्यंत जोरदार दगडफेक सुरु झाली. आम्ही दार-खिडक्या लावून घेतली. दगडफेक सुरु झाली तेव्हा मी माझे पती आणि मुलाला आत घेतले. तेव्हा पोलिसही त्यांच्यासोबत आमच्या घरात आले. त्यांच्यावरही जमावाकडून दगडफेक केली जात होती. पोलिसांना मारण्यासाठी जमावातील काहींनी गट्टू उचलला होता. त्यामुळे पोलीस संरक्षणासाठी आमच्या घरात आले, असे पेशने कुटुंबीयांनी सांगितले.


जमावातील लोकांनी तोंडावर रुमाल आणि मास्क लावले होते. याठिकाणी पोलीस होते. पण जमाव मोठा असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नव्हती. जमाव पूर्ण तयारीनिशी आला होता. त्यांनी आमच्या चारचाकी गाडीत मोठा दगड टाकून कार पेटवून दिली. ही कार पेशने कुटुंबीयांच्या घरालगत पार्क केली होती. त्यामुळे गाडीला आग लागल्यानंतर पेशने कुटुंबीयांच्या घराची भिंत आणि खिडकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे खिडकी आणि भिंतीचा परिसर काळाकुट्ट झाला आहे.


नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी


नागपूरमधील सोमवारच्या हिंसाचारावेळी पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी  गंभीर जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल आहेत. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते, ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला आहे, मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाले आहेत.


नागपूरमधील हिंसाचाराची राज्य सरकारकडून गंभीर दखल


नागपूरच्या महल आणि हंसापुरी परिसरातील हिंसाचाराच्या घटनेची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद साधणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे सकाळी 10 वाजता घटनास्थळी भेट देऊन महाल परिसराची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.



आणखी वाचा


नागपूरमध्ये पोलिसांना रस्त्यावर 'तो' महत्त्वाचा पुरावा सापडला, दंगलखोर बाईक सोडून पळाले