Nagpur Violence : नागपूर शहरात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. संतप्त जमावाने केलेल्या समाजविघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी झाल्याची शक्यता आहे. या घटनेत एक वरीष्ठ पोलीस अधिकाराही जखमी झाला आहे. दरम्यान, ही घटना समोर येताच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक पवित्रा घेतला आहे. नागपूर अशांत करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे.
कॉम्बिंग ऑपरेशन चालू, मुख्य सूत्रधाराला शोधण्यास सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहराला अशांत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता कडक कारवाई केली जाणार आहे. कोणलाही सोडले जाणार नाही. तसेच नागपूर अशांत करणारा मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. 17 मार्चच्या रात्रीच कॉम्बिंग ऑपरेशन चालू झाले असून सूत्रधाराला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला रवाना होणार
नागपूरमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडताच चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाची बैठक पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर बावनकुळे 18 मार्चच्या सकाळीच नागपूरच्या दिशेने तत्काळ रवाना होणार आहेत. बावनकुळे यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील अन्य आमदारही 18 मार्च रोजी घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. या घटनेत झालेल्या वित्तीय नुकसानीसह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा आढावादेखील 18 मार्च रोजी घेतला जाईल.
पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला
दुसरीकडे पोलिसांनी सध्या समाजकंटकांना पांगवण्यात यश मिळवले आहे. नागपूर शहरातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 दंगेखोरांना ताब्यात घेतलं आहे. दगडफेक करणाऱ्यांना पांगवताना जखमी झालेले पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. त्यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने थेट कुऱ्हाडीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले?
नागपूरच्या दुर्घटनेनंतर कायदा कोणीही हातात घेऊ नये. पोलिसांना सहकार्य करावे. दगडफेक आणि जाळपोळीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. नागपूर शहरात शांतता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नागपूरकरांना केले आहे. सध्या नागपुरातील परिस्थिती नियंंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
नागपुरातील जाळपोळ, दगडफेकीत DCP निकेतन कदम जखमी, हातावर कुऱ्हाडीने हल्ला!
मोठी बातमी! नागपूरमध्ये दगडफेक, परिसरात तणावाचं वातावरण!
औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी