नागपूर : विदर्भ महिला क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सलोनी अलोटच्या धाडसाचं नागपूर पोलिसांसह सगळेच कौतुक करत आहेत. याचं कारण म्हणजे तिने दाखवलेलं धाडसं. मध्यरात्री घरात घुसून चोरी केल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यावर तिने वाघिणीसारखी झडप घातली आणि मदत येईपर्यंत दहा मिनिटं संघर्ष करत त्याला जखडून ठेवलं. यानंतर सलोनीने त्याला पोलिसांच्या स्वाधीनही केलं. नागपुरात शनिवारी (22 फेब्रुवारी) ही घटना घडली.



काय घडलं शनिवारी रात्री?
24 वर्षीय सलोनी अलोट तिच्या आई-वडिलांसोबत नागपुरातील गिट्टीखदान परिसरातील स्वामी कॉलनीत राहते. शनिवारी रात्री ती कारने आई-वडिलांसह आपल्या मामाकडे गेली होती. रात्री दीड वाजता परतले तेव्हा घराच्या आवारात कोणी तरी शिरल्याची चाहूल तिच्या आई-वडिलांना लागली. सलोनी घरासमोर कार पार्क करत होती. आई-वडील बाहेरचा मेन गेट उघड असताना एका चोरट्याने घरातून बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. सलोनीच्या आई-वडिलांनी तिला हाक मारली. त्यावेळी कम्पाउंड वॉलवरुन उडी मारुन पळून जाणाऱ्या चोरट्याला सलोनीने बाहेर रस्त्यावर झडप घालून पकडले. दोघांमध्ये बरीच झटापट झाली. चोरट्याने तिथे असलेल्या विटा आणि दगडांनी सलोनीवर वार करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सलोनीने त्याच्यावरील पकड सैल केली नाही. आई-वडिलांनी आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावलं. शेजारी काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि नंतर पोलिसांना बोलावून चोराला त्यांच्या स्वाधीन केले.

धनराज पंचेश्वर असं चोरट्याचं नाव असून तो मध्य प्रदेशातील बालाघाटचा आहे. पोलिसांच्या रेकॉर्ड अनुसार तो सराईत चोर असून त्याने अनेक घरांमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे. पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. मात्र, शनिवार रात्री तो सलोनीच्या हातात लागला आणि त्याला पकडण्यात पोलिसानं यश आले आहे. त्याच्याकडून घरफोडीचं साहित्यासह लोखंडी रॉड पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी सलोनीचे आभार मानत तिच्या या धाडसाचे कौतुक केले आहे.

चोरट्याच्या हातात शस्त्रही असू शकते, अशा स्थितीत अंधारात मोकळ्या हाताने चोरट्याचा सामना करण्यासाठी खूप हिंमत लागते. मात्र, रणरागिरीनी सलोनीने अचाट धैर्य आणि हिंमत दाखवत त्याचा सामनाच केला नाही, तर त्याला नामोहरम करत पोलिसांच्या स्वाधीन ही केलं.